रस्ता कामासाठी धावणाऱ्या भरधाव डंपरच्या बेदरकार वाहतुकीमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात; कडक कारवाईची स्थानिकांची मागणी
देवरुख (संगमेश्वर, रत्नागिरी):
Deorukh Bamnoli Road Accident अंतर्गत देवरुख-बामणोली मार्गावरील मारळ येथे सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास खडी वाहून नेणारा एक डंपर रस्त्याकडेला उलटल्याची भीषण घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी याच मार्गावर सलग दुसऱ्यांदा डंपरचा अपघात घडल्याने मारळ आणि परिसरातील नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देवरुख-बामणोली मार्गावर रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी लागणारी खडी, माती व अन्य साहित्याची वाहतूक दिवस-रात्र डंपरच्या माध्यमातून केली जात आहे. मात्र, या मार्गावरून धावणारे डंपर चालक अत्यंत भरधाव आणि बेदरकारपणे वाहने चालवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास मारळजवळ असाच एक भरधाव खडीचा डंपर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला उलटला. अपघाताचा मोठा आवाज होताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
Deorukh Bamnoli Road Accident: सलग दुसऱ्या अपघातामुळे ग्रामस्थांची निदर्शने व प्रशासनाकडे मागणी
विशेष म्हणजे, याच मार्गावर अगदी काही दिवसांपूर्वीच असाच एक डंपर उलटून अपघात घडला होता. पाठोपाठ झालेल्या या दुसऱ्या अपघातामुळे मारळ व परिसरातील ग्रामस्थांचा संयम आता सुटत चालला आहे. रस्त्याचे काम त्वरीत आणि दर्जेदार पूर्ण व्हावे ही सर्वांचीच इच्छा असली, तरी कंत्राटदार आणि डंपर चालकांच्या बेदरकार व अतिवेगातील वाहतुकीमुळे दैनंदिन प्रवासी व ग्रामस्थांच्या जिवाला थेट धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने या भरधाव धावणाऱ्या डंपर चालकांवर त्वरीत चाप लावावा, वेगावर मर्यादा आणाव्यात आणि सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.













