गडचिरोलीला ‘ऑरेंज अलर्ट’, तर कोकण, विदर्भ व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Rain Weather Updates च्या संदर्भात हवामान खात्याकडून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या हालचालींमुळे देशातील १० राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने सरकत असून त्याचे संभाव्य ‘अर्णव’ चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या वातावरणीय बदलांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात पुढील काही दिवसांत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील दोन दिवस हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याची शक्यता असली, तरी २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या सरी कोसळू शकतात.
दिवसनिहाय पावसाचा अंदाज आणि अलर्ट पुढीलप्रमाणे:

२७ ऑक्टोबर: विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या काळात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
२८ ऑक्टोबर: राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दिवशी गडचिरोली जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) देण्यात आला असून, तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली आणि कोल्हापूर घाट परिसरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातही पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
२९ ऑक्टोबर: रत्नागिरी, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, जालना, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा
तामिळनाडू आणि पुदुचेरी किनारपट्टीवर ५० ते ६० किमी वेगाने, तर बंगालच्या खाडीत ताशी ९० ते १०० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ व मराठवाड्यात २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकत असल्याने, शेतकऱ्यांनी काढणीस आलेला शेतमाल सुरक्षित स्थळी हलवावा आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.













