खेड येथील आरपीआयच्या तालुका मेळाव्यात वक्तव्य; मनोज जरांगे ५०० कोटी वादावर चौकशीची मागणी
Ramdas Athawale Khed Melawa च्या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) च्या खेड तालुका मेळाव्यात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ईव्हीएम मशीनवरून विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. "तुम्हाला जर बॅलेट पेपरच हवा होता, तर मग राजीव गांधी यांच्या कार्यकाळात ईव्हीएम मशीन देशात का आणली?" असा थेट सवाल करत आठवले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा काँग्रेस अथवा त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार आले, तेव्हा आम्ही कधीही ‘व्होट चोरी झाली’ असा आरोप केला नाही. ज्याला जनतेचे बहुमत मिळते, त्याला सत्तेवर येण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे विरोधकांनी जनतेत खोटा प्रचार करू नये, असेही आठवले यांनी ठणकावून सांगितले.
Manoj Jarange Patil 500 Crore Audio Clip Row: मनोज जरांगे ५०० कोटी वादाची झाली पाहिजे चौकशी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक व्यवहाराच्या आरोपांवर बोलताना आठवले यांनी जरांगे यांची बाजू घेतली. "मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये दिले, असे म्हणणे पूर्णपणे अयोग्य आहे. त्या कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली. मनोज जरांगे यांचे आंदोलन संपवण्यासाठी भाजपने पैसे दिले अशा केवळ खोट्या चर्चा पसरवल्या जात असून, अशा प्रकारे कोणाचीही नाहक बदनामी करणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

"संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा सत्यानाश करू"
आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणे इतके सोपे नाही. संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा सत्यानाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. केवळ आंदोलन करून संविधान बदलता येत नाही आणि देशाची सत्ताही बदलता येत नाही." सत्ता हवी असल्यास विरोधकांनी २०२९ मध्ये जनतेमध्ये जावे, लोकांचे मतपरिवर्तन करावे आणि मते मिळवून सत्तेवर यावे, असा सल्ला त्यांनी दिला. भारताचे कधीही ‘बांगलादेश’ होऊ देणार नाही, देशात बाबासाहेबांचे संविधान कायम अमर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा मोठा कायापालट झाल्याचा दावा त्यांनी केला.













