२०२९ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील’; मंत्री नितेश राणेंचा राजकीय दावा
शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी राज्याच्या हितासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात, असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे। या वक्तव्यावर मंत्री नितेश राणे Nitesh Rane यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। "या वक्तव्याची आमच्या वरिष्ठांनी दखल घेतली असून ते योग्य निर्णय घेतील, आम्ही त्याची वाट पाहत आहोत," असे राणे म्हणाले। याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर दावा करत, "येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे जेलमध्ये असतील," असे सांगत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे।
"संजय राऊतांचे कोणतेही भाकीत खरे ठरलेले नाही"
खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, "आत्तापर्यंत संजय राऊत यांचे कोणतेही भाकीत खरे ठरलेले नाही। कदाचित त्यांनी स्वतःच्या मालकाच्या जेलमध्ये जाण्याची तारीख एप्रिल महिन्यात ठरवली असावी," असा थेट टोला त्यांनी लगावला।

केंद्र आणि राज्य सरकारच्या मजबुतीवर बोलताना राणे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार २०२९ मध्ये आणखी मोठ्या मताधिक्याने आणि ताकदीने निवडून येईल। महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार मजबूत होत आहे। २०२९ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील; ते महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान आहेत। तसेच, आम्ही राज ठाकरेंना कधीही नाराज केले नाही आणि पुढेही करणार नाही."
"उद्धव ठाकरेंनी फोटोग्राफी केली असती तर पक्षाला गालबोट लागले नसते"
मुंबईतील सागरी होर्डिंग्सबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांवर स्पष्टीकरण देताना नितेश राणे म्हणाले, "मुंबईच्या समुद्रकिनारी फक्त ४ ठिकाणी स्पॉट्स असणार आहेत, २० ठिकाणी नाही। समुद्रात सगळीकडे होर्डिंग्स दिसणार असा चुकीचा अपप्रचार केला जात आहे। आमचे सरकार मुंबईला पर्यटन आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यास सज्ज आहे। मी स्वतः मुंबईकर असल्याने मुंबईच्या पर्यावरणाला किंवा सौंदर्याला कुठेही हानी पोहोचू देणार नाही."
ठाकरे बंधूंवर निशाणा साधताना राणे म्हणाले, "उद्धव ठाकरे हे जर राजकारण सोडून फक्त फोटोग्राफी करत राहिले असते तर अनेक गोष्टी टाळता आल्या असत्या आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला गालबोट लागले नसते। ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी दिलेला सल्ला ठाकरे बंधूंनी ऐकावा, जेणेकरून त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल."













