एक जण गंभीर जखमी
Chiplun Bike Accident News बाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील गजमल पिंपळी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी दुर्घटनेत शासकीय कर्मचारी आणि माजी कबड्डीपटू अशोक कृष्णा राणे (वय ५५, रा. कोळकेवाडी) हे जागीच ठार झाले आहेत. ऐन दिवाळीच्या सण-उत्सवाच्या काळात ही घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. या अपघातात दुसरी दुचाकी चालवणारे संजय श्रीकांत पवार (वय ४५, रा. नांदिवसे) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अशोक राणे आणि संजय पवार हे दोघेही आपापल्या दुचाकीवरून प्रवास करत होते. गजमल पिंपळी परिसरामध्ये आले असता दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, अशोक राणे यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आणि जखमी संजय पवार यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
Chiplun Bike Accident News: क्रीडा क्षेत्रात व जलसंपदा विभागात होते कार्यरत

मृत अशोक राणे हे जलसंपदा विभागात शासकीय सेवेत कार्यरत होते. याशिवाय क्रीडा क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते; कोळकेवाडी येथील ‘राधाकृष्ण क्रीडा मंडळ’ व ‘वाघजाई क्रीडा मंडळ’ या संघांचे ते ज्येष्ठ व अनुभवी कबड्डीपटू म्हणून परिचित होते. त्यांच्या अचानक जाण्याने कोळकेवाडी परिसरावर आणि क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
अलोरे-शिरगाव पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा
अपघाताची माहिती मिळताच अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक प्रशांत अवारे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. आर. नलावडे, मनोज कुळे आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोळी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. कामथे उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) केल्यानंतर अशोक राणे यांचा मृतदेह शोकाकुल वातावरणात नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.













