महिला पतसंस्थेचे कार्यालयही धोक्यात; ७ ते ८ अग्निशामक बंब दाखल होऊनही आग अनियंत्रित, संपूर्ण परिसर धुराने वेढला
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील के. सी. जैन नगर परिसरातील महालक्ष्मी मिनी मॉलला लागलेल्या भीषण आगीने आता अधिकच रौद्र रूप धारण केले आहे. ही आग केवळ मॉलपुरती मर्यादित न राहता आसपासची दुकाने आणि कार्यालयांमध्ये वेगाने पसरत चालली आहे. मॉलमधून भडकलेल्या या आगीने शेजारीच असलेल्या नामांकित ‘दैनिक सागर’ या वृत्तपत्राच्या कार्यालयाला आपल्या कचाट्यात घेतले असून, इमारतीच्या मागील बाजूच्या कार्यालयांमध्येही ज्वाळा पोहोचल्या आहेत. अग्निशामक दलाचे तब्बल ७ ते ८ बंब घटनास्थळी दाखल झाले असूनही ही आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही.
‘दैनिक सागर’च्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या ज्वाळा :
महालक्ष्मी मिनी मॉलला लागलेली आग इतकी तीव्र आहे की तिच्या ज्वालांनी लगतच्या व्यावसायिक गाळ्यांना वेढण्यास सुरुवात केली आहे. मॉलच्या अगदी शेजारीच असणाऱ्या ‘दैनिक सागर’च्या कार्यालयापर्यंत ही आग पोहोचली असून, आगीच्या प्रचंड लोटांमुळे परिसरातील इतर व्यापारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली आहे.

पतसंस्थेसह मागील बाजूची कार्यालये व दुकाने धोक्यात :
सदर व्यावसायिक संकुलामध्ये मागील बाजूस अनेक महत्त्वाची कार्यालये आणि छोटी-मोठी दुकाने आहेत. यामध्ये ‘रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्था’ या नामांकित संस्थेचे मुख्य कार्यालयही याच इमारतीत आहे. इमारतीच्या मागील बाजूला आग वेगाने पसरत असल्याने महिला पतसंस्थेचे कार्यालय तसेच इतर दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची गंभीर भीती निर्माण झाली असून, आतील महत्त्वाचे दस्तऐवज आणि साहित्याबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
७ ते ८ बंबांचा पाण्याचा मारा, तरीही आग अनियंत्रित :
आगीची भीषणता पाहता नगरपालिकेसह नजीकच्या एमआयडीसी व इतर ठिकाणांवरून अतिरिक्त बंब मागवण्यात आले आहेत. घटनास्थळी आतापर्यंत तब्बल ७ ते ८ अग्निशामक बंब दाखल झाले असून जवानांकडून पाण्याचा जोरदार मारा सातत्याने सुरू आहे. मात्र, इमारतीतील प्लास्टिक, कपडे आणि इतर ज्वलनशील साहित्यामुळे आग आटोक्यात येण्याऐवजी अधिकच धुमसत चालली आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नागरिक घटनास्थळी बचावकार्यात गुंतले असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.













