आगीचे रौद्र रूप, धुराचे लोट दूरवरून दृश्यमान; अग्निशामक दलाच्या ४ ते ५ गाड्या घटनास्थळी, पाण्याच्या तुटवड्यामुळे विझवण्यात अडथळे
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील के. सी. जैन नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत प्रसिद्ध ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ अक्षरशः जळून खाक झाला आहे. पाहता पाहता आगीने अत्यंत रौद्र रूप धारण केल्यामुळे मॉलसह आजूबाजूच्या दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ४ ते ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीचे रौद्र रूप अन् धुराचे लोट :
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे अचानक मॉलच्या इमारतीतून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. अल्पावधीतच आगीने संपूर्ण इमारतीला आपल्या विळख्यात घेतले. आगीच्या प्रचंड ज्वाला आणि काळ्याकुट्ट धुराचे लोट कित्येक किलोमीटर अंतरावरून स्पष्ट दिसत होते. आगीची तीव्रता इतकी प्रचंड आहे की अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत असतानाही आग अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही.

पाण्याच्या कमतरतेमुळे मदतकार्यात अडथळे :
रत्नागिरी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असले, तरी पाण्याचा मोठा तुटवडा जाणवत असल्याने आग विझवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. पाण्याची कमतरता भासत असल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नजीकच्या भागातून पाण्याचे अतिरिक्त टँकर्स मागवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान; जीवितहानी टळली :
या आगीत महालक्ष्मी मिनी मॉल व बाजूला असणाऱ्या दुकानांना आगीने भक्ष केले आहे. त्यातील संपूर्ण साहित्य जळून भस्मसात झाले आहे. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दुर्घटनेमुळे संबंधित व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरू असून, सुदैवाने या भीषण दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.













