हजारो किलोमीटरचा प्रवास करून कोकणात दाखल झालेल्या परदेशी पक्ष्याला पाहण्यासाठी पक्षीप्रेमी व अभ्यासकांची मोठी गर्दी; जैवविविधतेसाठी महत्त्वाची नोंद
White stork Ratnagiri तालुक्यात प्रथमच आढळून आल्याने कोकणातील पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच कोकणात परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून, महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या युरोपियन ‘पांढऱ्या करकोच्या’ने गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी शहरातील (ता. जि. रत्नागिरी) चंपक मैदानावर आपला मुक्काम ठोकला आहे. या परदेशी पाहुण्याची एक झलक पाहण्यासाठी स्थानिक पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांनी मैदानावर मोठी गर्दी केली आहे.
मूळचा युरोप, मध्य आशिया आणि पश्चिम आशियातील रहिवासी असलेला हा पांढरा करकोचा तेथील कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी दरवर्षी हजारो किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास करतो. नोव्हेंबर महिन्यात भारतीय उपखंडात स्थलांतर केल्यानंतर, फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत हा पक्षी पुन्हा आपल्या मूळ अधिवासाकडे परतीचा प्रवास सुरू करतो. भारतामध्ये प्रामुख्याने गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांतील पाणथळ जागा, तलाव, दलदलीचा प्रदेश, गवताळ कुरणे आणि शेतीच्या मैदानांत या पक्ष्याचे वास्तव्य प्रकर्षाने पाहायला मिळते.
रत्नागिरीच्या जैवविविधतेसाठी महत्त्वाची नोंद
महाराष्ट्रामध्ये या युरोपियन पांढऱ्या करकोच्याचे दर्शन अत्यंत क्वचितच घडते. यापूर्वी गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख आणि चिपळूण येथे हा पक्षी पाहण्यात आला होता. मात्र, यंदा रत्नागिरी तालुक्यात त्याची ही पहिलीच अधिकृत नोंद ठरल्याची माहिती स्थानिक पक्षीमित्र अक्षय तोंडवळकर यांनी दिली आहे.
कोकणातील हिवाळ्यातील अनुकूल वातावरण आणि मैदानी परिसरात उपलब्ध असलेले मुबलक खाद्य यामुळे हा दुर्मीळ परदेशी पाहुणा रत्नागिरीत चांगलाच रमल्याचे चित्र दिसून येत आहे. रत्नागिरी तालुक्याच्या समृद्ध जैवविविधतेच्या दृष्टीने या पक्ष्याचे वास्तव्य आणि नोंद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.














