चिपळूण येथील पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांची राजकीय आणि विकासात्मक विषयांवर रोखठोक मांडणी; राष्ट्रवादी व शिवसेना विलीनीकरणाच्या चर्चांवरही केले भाष्य
Uday Samant Chiplun दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लोटे औद्योगिक वसाहतीतील पाणीप्रश्न, आगामी पाणीटंचाईचे नियोजन, महायुतीतील समन्वय आणि राज्यातील सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींवर आपली सविस्तर भूमिका मांडली. चिपळूण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे पार पडलेल्या या पत्रकार परिषदेला माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम आणि नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
लोटे एमआयडीसी परिसरातील पाणीप्रश्नाबाबत बोलताना उदय सामंत यांनी हा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडवण्याची ग्वाही दिली. आगामी काळात या भागात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस पाडणे शासनाच्या हातात नसले, तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे प्रशासनाच्या हातात आहे. एमआयडीसीकडे उपलब्ध असलेला पाणीसाठा, त्याची मर्यादा आणि भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास उद्योगांना पाणीपुरवठा कसा करायचा, या सर्व मुद्द्यांवर सर्व संबंधितांची संयुक्त बैठक घेऊन सामूहिक पद्धतीने मार्ग काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील समन्वय आणि राजकीय चर्चांवर भाष्य
महायुतीमधील अंतर्गत कार्यपद्धतीवर बोट ठेवताना सामंत म्हणाले की, राज्यमंत्री, आमदार किंवा खासदार यांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामांचे कार्यक्रम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, महायुतीच्या माध्यमातून एकाच विकासकामाचे दोन-दोन वेळा स्वतंत्रपणे भूमिपूजन होणे सरकारच्या दृष्टीने योग्य नाही. ही केवळ माझीच नव्हे, तर कार्यकर्त्यांचीही भावना असून असे विषय एकत्र बसून चर्चेने संपवले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या (शरद पवार गट आणि अजित पवार गट) विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलताना, एकत्र यायचे की नाही हा त्या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. एक शिवसैनिक म्हणून त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही, मात्र जनतेप्रमाणेच माझ्याही मनात संभ्रम आहे; चार महिन्यांपूर्वीची भूमिका आणि आत्ताची भूमिका यात फरक असल्याने संबंधित नेत्यांनी याचा खुलासा करावा, असे ते म्हणाले. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम देताना, पक्ष एकत्र आणण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडेच असून त्यांच्याच नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही दमदारपणे काम करत आहोत, असे सामंत यांनी ठामपणे सांगितले.
आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी शरद पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मला पहिले तिकीट शरद पवार साहेबांनी अजितदादांच्या पाठिंब्यावर दिले आणि माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या नेतृत्वाखाली झाली, हे सांगायला मला कोणताही कमीपणा वाटत नाही; मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री म्हणून संधी दिल्यानंतरच महाराष्ट्राला माझी खरी ओळख झाली, असे त्यांनी नमूद केले.
चिपळूणमधील विकासकामे आणि पर्यटन प्रकल्प
चिपळूण नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाबाबत माहिती देताना त्यांनी ११ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मंजुरीचा उल्लेख केला. शासकीय नियमानुसार उपलब्ध निधीच्या १० टक्के रक्कम जमा असल्यास मोठ्या रकमेचे टेंडर काढता येते. या इमारतीचा एकूण खर्च २० ते २५ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असून उर्वरित निधी नगरविकास खात्याकडून उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तसेच कुंभार्ली घाटाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असून, दऱ्यांमधील पर्यटन, पूल आणि वॉटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून कोकणातील पर्यटनाला चालना दिली जात आहे. सातारा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणाला जोडणाऱ्या तीन बोगद्यांची घोषणा केली असून, त्याचा मोठा फायदा पर्यटन विकासाला होणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. दरम्यान, चिपळूणमधील प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या खराब शासकीय निवासस्थानांबाबत बोलताना, निवासस्थान सुस्थितीत नसल्यास भाड्याच्या घरात राहण्यासाठी शासनाकडून भाडे देण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपांना त्यांनी निवडणुकीच्या प्रचारातील राजकीय नॅरेटिव्ह संबोधले.














