कोल्हापूर बाजार समितीत रत्नागिरी हापूस आंब्याचा ऐतिहासिक सौदा; एका पेटीला तब्बल ५५ हजार रुपयांचा विक्रमी दर

कोल्हापूर बाजार समितीत रत्नागिरी हापूस आंब्याचा ऐतिहासिक सौदा; एका पेटीला तब्बल ५५ हजार रुपयांचा विक्रमी दर

राजापूरच्या आंबा उत्पादक तांबे बंधूंच्या ६ डझन हापूस आंब्याच्या पेटीला उच्चांकी बोली; एका आंब्याची किंमत ७६३ रुपयांवर पोहोचल्याने कोकणातील बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण

कोल्हापूर / रत्नागिरी: कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याच्या हंगामातील सौद्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. बाजार समितीचे चेअरमन गणेश देसाई व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सौद्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील हापूस आंब्याच्या ६ डझनाच्या एका पेटीला तब्बल ५५ हजार रुपयांची विक्रमी बोली लागली आहे. या उच्चांकी दरामुळे संपूर्ण राज्यात कोकणच्या हापूस आंब्याची आणि त्याला मिळालेल्या ऐतिहासिक भावाची विशेष नोंद घेतली जात आहे.

२० हजारांपासून सुरू झालेली बोली ५५ हजारांवर पोहोचली
कोल्हापूर फळ मार्केट येथील यासीन बालमभाई बागवान यांच्या ‘YBB फ्रुट’ या दुकानावर हा विशेष लिलाव पार पडला. सौद्याच्या सुरुवातीला आंब्याच्या पेटीसाठी २० हजार रुपये अशी बोली लावण्यात आली होती. मात्र, आंब्याचा दर्जा आणि मागणी पाहता ही बोली वाढत जाऊन अखेर ५५ हजार रुपयांवर स्थिरावली. गणेश वाळुंज यांनी ही उच्चांकी बोली लावून हापूस आंब्याची पेटी खरेदी केली. ६ डझन (७२ नग) आंब्यांच्या या पेटीला ५५ हजार रुपये दर मिळाल्याने, एका हापूस आंब्याची किंमत तब्बल ७६३ रुपये इतकी झाली आहे.

राजापूरच्या शेतकरी बंधूंच्या बागेतील आंब्याला मोठी पसंती
हा विक्रमी दर मिळालेला हापूस आंबा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी स्वप्निल तांबे आणि तानाजी तांबे या दोन भावांच्या बागेतील आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी आणि राजापूर भागातील हापूस आंब्याची चव व दर्जा नेहमीच अव्वल मानला जातो, यावर या सौद्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

Radhakrushna patapedhi

दुष्काळाच्या संकटात आंबा उत्पादकांना मोठा दिलासा
सध्या राज्यात दुष्काळाचे सावट असताना शेतकरी वर्ग चिंतेत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोल्हापूरच्या मार्केट यार्डातील आंबा सौद्याला मिळालेल्या या विक्रमी दरामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच मिळालेला हा दर बागायतदारांच्या आशा पल्लवित करणारा ठरला आहे.