रत्नागिरी बाजारपेठ रस्ता रुंदीकरण :  स्वातंत्र्य लक्ष्मी चौक ते तेली आळी नाका मार्गाच्या सर्वेक्षणाला आजपासून प्रारंभ

पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पाहणी दौऱ्यानंतर प्रशासनाची वेगवान पावले; पुढील १० दिवस चालणार सर्वेक्षण, त्यानंतर तयार होणार रुंदीकरणाचा अंतिम आराखडा

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील स्वातंत्र्य लक्ष्मी चौक ते तेली आळी नाका या महत्त्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाला (सर्व्हे) आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी मागील रविवारी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशांनुसार प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. हे सर्वेक्षण पुढील सुमारे १० दिवस चालणार असून, त्यानंतर या रस्त्याचे नेमके किती रुंदीकरण करण्यात येणार आहे, याचा सविस्तर आराखडा (प्लॅन) तयार केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
अरुंद रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासाची पालकमंत्र्यांकडून दखल :
रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेला हा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही रोज मोठा मनस्ताप आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. येथील स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी मागील रविवारी या संपूर्ण मार्गाची पायी पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला होता.
मारुती मंदिरातील बैठकीनंतर प्रशासनाला दिले होते निर्देश :
पाहणी दौऱ्यानंतर रत्नागिरी शहरातील मारुती आळी येथील मारुती मंदिरात पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी बाधित व स्थानिक नागरिकांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले होते. नागरिकांच्या सूचना व भावना लक्षात घेऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळपासून प्रशासकीय यंत्रणेकडून या रस्त्याच्या मोजमाप आणि सर्वेक्षणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

Arihant 1