चिपळूण परिसरात ६०० एकर वृक्षारोपणासाठी टोरांटो कंपनीचे सर्वेक्षण अपयशी; जागा न मिळाल्याने प्रतिनिधींनी गुंडाळला गाशा

चिपळूण परिसरात ६०० एकर वृक्षारोपणासाठी टोरांटो कंपनीचे सर्वेक्षण अपयशी; जागा न मिळाल्याने प्रतिनिधींनी गुंडाळला गाशा

कर्जत येथील प्रस्तावित पॉवर प्लॅन्टच्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीच्या रांगेत सुरू होता जागेचा शोध; मात्र दलालांनी १० टक्के मोबदला घेऊनही पदरी निराशा

चिपळूण: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरांटो पॉवर प्लॅन्टसाठी होणाऱ्या मोठ्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर, पर्यायी वृक्षारोपणासाठी या कंपनीने आपला मोर्चा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरातील सह्याद्रीच्या रांगेत वळविला होता. तब्बल ६०० एकर जागेवर वृक्षारोपण करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या प्रतिनिधींनी स्थानिक पातळीवर सखोल सर्वेक्षणही केले. मात्र, या सर्वेक्षणात आणि जमीन मिळवण्याच्या प्रक्रियेत अपेक्षित यश न आल्याने कंपनीच्या प्रतिनिधींनी आता येथून गाशा गुंडाळल्याची माहिती समोर आली आहे.

कर्जतमधील वृक्षतोडीचा विरोध आणि रत्नागिरीतील जागेचा शोध
कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरांटो प्रकल्पासाठी तब्बल ६०० एकर जमिनीवरील झाडांची तोड होणार असल्याने स्थानिक नागरिक आणि आदिवासी बांधवांकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला जात आहे. शासकीय आकडेवारीनुसार या प्रकल्पासाठी ४० हजार झाडे तोडली जाणार असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात हा आकडा लाखोंच्या घरात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वृक्षतोडीच्या विरोधात ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनीही सहभाग घेतला आहे. या सर्व विरोधाच्या पार्श्वभूमीवर, समतोल साधण्यासाठी आणि ६०० एकर जमिनीवर नवीन झाडे लावण्यासाठी संबंधित कंपनीने रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्याची निवड केली होती.

दलालांनी १० टक्के मोबदला उकळला, पण जागा मिळालीच नाही
सह्याद्रीच्या कुशीत ६०० एकर सलग जागा मिळवण्यासाठी टोरांटो कंपनीच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. या कामासाठी स्थानिक पातळीवर अनेक दलालही सक्रिय झाले होते. या दलालांनी कंपनीच्या प्रतिनिधींना चिपळूण व सह्याद्री पट्ट्यातील विविध जमिनी दाखवल्या आणि व्यवहार पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू केली. धक्कादायक बाब म्हणजे, ही जमीन खरेदीची किंवा हस्तांतरणाची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी संबंधित दलालांनी दहा टक्के मोबदलाही घेतला.

Shanti real estate 1

वनक्षेत्र आणि ‘ग्रीन कव्हर’ वाढण्याची संधी हुकली
मोबदला देऊनही आणि सर्व प्रयत्न करूनही कंपनीला सह्याद्री पट्ट्यात आवश्यक असलेली ६०० एकर जागा अद्याप मिळू शकलेली नाही. परिणामी, जागेचा शोध थांबवून कंपनीच्या प्रतिनिधींनी या भागातून माघार घेतली आहे. दुसरीकडे, या संपूर्ण प्रक्रियेत मध्यस्थी करणाऱ्या काही दलालांनी मात्र आपला आर्थिक फायदा करून घेतल्याची चर्चा सध्या सह्याद्री पट्ट्यात रंगली आहे. जर संबंधित कंपनीला या भागात ६०० एकर जागा उपलब्ध झाली असती, तर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होऊन वन विभागाच्या वनक्षेत्रात आणि परिसराच्या ‘ग्रीन कव्हर’मध्ये मोठी भर पडली असती, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.