स्पीडब्रेकरसाठी ठेवलेल्या बॅरलवर दुचाकी आदळून झाला होता अपघात; कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
Nanij Accident Death संदर्भात भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने स्पीडब्रेकरसाठी लावण्यात आलेल्या बॅरलवर आदळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नाणीज येथील एका ४३ वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विश्वास रामदास रसाळ (वय ४३, रा. नाणीज, ता. जि. रत्नागिरी) असे या मृत दुचाकीस्वाराचे नाव असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अपघाताची घटना १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. मयत विश्वास रसाळ हे आपल्या मालकीची मोटारसायकल (क्र. एमएच/०८/पी/२०५८) घेऊन पाली ते नाणीज असा प्रवास करत होते. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अत्यंत वेगात आणि हयगईने दुचाकी चालवत असताना नाणीज जुना मठ येथे वेग नियंत्रणासाठी स्पीडब्रेकर म्हणून ठेवण्यात आलेल्या बॅरलवर त्यांची दुचाकी जोरात आदळली.
Nanij Accident Death प्रकरणी कोल्हापुरात उपचारादरम्यान मृत्यू
या भीषण अपघातात विश्वास रसाळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर रत्नागिरीतील पारकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील अस्टर आधार हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच २२ ऑक्टोबर रोजी पहाटे १:४५ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद
स्वतःच्या मृत्यूस आणि वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल तृप्ती रविकांत सावंतदेसाई यांनी १९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मयत विश्वास रसाळ याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २९६/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.













