स्तनपान, लसीकरण व नियमित आरोग्य तपासणीवर भर; पालकांना आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचे आवाहन
Ratnagiri Newborn Health Campaign संदर्भात नवजात बालकांचे आरोग्य जपण्यासह बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि बालकांची निरोगी वाढ व सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत हा सप्ताह सुरू आहे.
या वर्षी सप्ताहाची संकल्पना ‘लहान बाळे, मोठी क्षमता : त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा’ अशी ठेवण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये नवजात बालकांचे संगोपन, स्तनपान, लसीकरण, पोषण आणि नियमित आरोग्य तपासणीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. विशेषतः अकाली जन्मलेली, कमी वजनाची तसेच विशेष नवजात शिशू उपचार कक्षात उपचार घेतलेल्या बालकांच्या आरोग्याचा नियमित पाठपुरावा करण्यावर भर दिला जात आहे.
Ratnagiri Newborn Health Campaign मधील गृहभेटी आणि प्रशासनाचे आवाहन
आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी आणि पथक यांच्या समन्वयातून गृहभेटी व आरोग्य तपासणी केली जात आहे. नवजात बालकाला रुग्णालयातून घरी सोडल्यानंतरही त्याच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे आणि वेळोवेळी पाठपुरावा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

प्रत्येक बालकाला योग्य काळजी आणि वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी पालकांनी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.













