पाणीटंचाईचे संकट गडद; धरणांतील जलसाठा घटला, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन
Ratnagiri Groundwater Drop संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यात यंदा म्हणावा तितका पाऊस न झाल्यामुळे भूजल पातळी कमी होत चालली असून, सरासरी भूजल पातळी ३ मीटरने घसरली आहे. त्यामुळे विहिरींमधील गाळ काढणे आणि वनराई बंधारे बांधण्यावर भर देण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे जिल्ह्यात एप्रिल किंवा मे महिन्यात पाण्याची टंचाई भासत असते, मात्र आता काही गावांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांवर डिसेंबरमध्येच टँकर सुरू करण्याची शक्यता असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी शुक्रवारी सांगितले.
जिल्ह्यात यंदा २ हजार ६९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सात तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या विहिरींच्या निरीक्षणात सरासरी भूजल पातळी ३ मीटरने घसरल्याचे समोर आले असून, रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांत सर्वाधिक घट झाली आहे.
Ratnagiri Groundwater Drop: जलसाठ्याची स्थिती व उपाययोजना
कमी पावसाचा थेट परिणाम जिल्ह्यातील जलसाठ्यांवर झाला आहे:

लघुपाटबंधारे प्रकल्प: सध्या केवळ ७५ टक्के जलसाठा शिल्लक आहे, जो मागील वर्षी ९४ टक्के होता.
७२ धरण प्रकल्प: सध्या ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षी याच कालावधीत हा जलसाठा ८२ टक्क्यांपर्यंत होता.
जलसंधारण व उपाययोजना: संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने प्राधान्य देत ७ हजारहून अधिक वनराई बंधारे बांधले आहेत. तसेच विहिरींमधील गाळ काढण्यात येणार असून, जिल्हा परिषदेच्या ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मोहिमेलाही यश मिळाले आहे.
डिसेंबरमध्येच टँकरची शक्यता; काटकसरीचे आवाहन
उन्हाळ्यापूर्वीच डिसेंबरमध्ये काही गावांत आणि वाड्या-वस्त्यांवर टँकरची गरज भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.













