Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana 2026: एकवेळ समझोता (OTS) योजनेची १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana 2026: एकवेळ समझोता (OTS) योजनेची १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

दोन लाख रुपयांवरील हिश्श्याची रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत; नाशिक विभागात सर्वाधिक लाभार्थी

Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana 2026 संदर्भात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेसाठी पात्र ठरलेल्या १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, या योजनेत कर्जमुक्ती, एकवेळ समझोता (ओटीएस) आणि प्रोत्साहन असे तीन घटक समाविष्ट आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमुक्ती घटकाअंतर्गत २५.८१ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या २०.७२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १८ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती देण्यात आली आहे.

Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana 2026: ओटीएस योजनेची कार्यपद्धती आणि अटी
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकवेळ समझोता (ओटीएस) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या दोन लाख रुपयांवरील कर्जाच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. बँकांकडून प्राप्त माहितीचे संगणकीय संस्करण करून ही पहिली यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Shanti real estate 1

यादीतील तपशील: शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँकेचे नाव, बँक शाखा, विकास संस्थेचे नाव, कर्जखाते क्रमांक, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, ओटीएस नुसार थकबाकीची रक्कम, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम यांचा यात समावेश आहे.

रक्कम भरण्याची प्रक्रिया व मुदत: एकाच बँकेत कर्जखाते असलेल्या शेतकऱ्यांनी यादीतील रक्कम संबंधित खात्यात जमा करावी, तर एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्यांना कोणत्याही एका कर्जखात्यात रक्कम जमा करण्याची सुविधा आहे (मात्र देय रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करू नये). शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत आहे.

पोर्टल अद्ययावतीकरण व आधार प्रमाणीकरण: शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेची माहिती बँकेकडून दर शुक्रवारी पोर्टलवर अपलोड केली जाईल. थकबाकी अद्ययावत केल्याच्या तीन दिवसांनंतर आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होईल. योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे आवश्यक आहे.

विभागनिहाय पात्र शेतकऱ्यांची संख्या
प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीत विभागनिहाय पात्र शेतकऱ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

नाशिक विभाग: ४८,३७९ (सर्वाधिक)

पुणे विभाग: ४०,९४६

छत्रपती संभाजीनगर विभाग: ३९,५९७

अमरावती विभाग: २५,९१७

नागपूर विभाग: १२,००२

कोकण विभाग: २,९७९

बँकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे संगणकीय संस्करण सुरू राहणार असल्याने पुढील काळातही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तसेच मृत, वयोवृद्ध आणि बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.