Chiplun News: श्री ग्रामदेव जुना कालभैरव मंदिरात आजपासून महोत्सवाचे आयोजन

Chiplun News: श्री ग्रामदेव जुना कालभैरव मंदिरात आजपासून महोत्सवाचे आयोजन

दररोज धार्मिक विधी, भजन, कीर्तन, सवाद्य पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचे नियोजन

Kalbhairav Jayanti Festival in Chiplun च्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध आणि जागृत श्रद्धास्थान असलेल्या श्री ग्रामदेव जुना कालभैरव मंदिरात २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टच्या वतीने होणाऱ्या या महोत्सवासाठी मंदिर परिसरात पारंपरिक उत्सवाची तयारी सुरू असून भाविकांनी दर्शनाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पूर्ण कालावधीत म्हणजेच २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान दररोज सकाळी सनई-चौघडा वादन आणि श्रींची नित्यनियमित पूजा-अर्चा होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता कर्पूर आरती पार पडल्यानंतर श्री कालभैरव ध्यानं, स्तोत्र, अष्टक आणि कवच पठण असे नियमित धार्मिक विधी आयोजित केले आहेत.

सायंकाळच्या सत्रात स्थानिक तसेच पंचक्रोशीतील महिला भजन मंडळांच्या संगीतमय भजनांची मालिका रंगणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री विश्वकर्मा प्रासादिक महिला संगीत भजन सादर होईल. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ दरम्यान पेठमाप येथील श्री जिव्हेश्वर प्रासादिक महिला संगीत भजन मंडळाचा कार्यक्रम होईल.

Infigo eyecare

भजनाच्या या परंपरेत २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत पेठमाप येथील श्री कालिका माता प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ आपली सेवा रुजू करेल. पुढे २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजता खेर्डी येथील तालसाधना प्रासादिक महिला संगीत भजन मंडळाचे सादरीकरण होणार आहे.

Kalbhairav Jayanti Festival in Chiplun: बालकलाकार आणि महिला मंडळांचे सादरीकरण
महोत्सवाच्या उत्तरार्धातील सायंकाळच्या सत्रांमध्ये उदयोन्मुख कलाकारांच्या सादरीकरणासह स्थानिक भजन मंडळांचा सहभाग राहणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजता कै. वामनराव साडविलकर संस्थापित स्वरदर्शन कलाकुंज, चिपळूण प्रस्तुत ‘संगीत स्वरसुमनांजली’ अंतर्गत ‘स्वरबाल्य’ हा कार्यक्रम होईल, ज्यामध्ये उदयोन्मुख बालकलाकार सहभागी होणार आहेत.

त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कान्हे-पिंपळी येथील श्री स्वर साधना प्रासादिक महिला संगीत भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

१ डिसेंबर रोजी श्री कालभैरव जयंती (कालाष्टमी) निमित्त विशेष कार्यक्रमांची रेलचेल असेल. या दिवशी पहाटे ६ ते ७ आणि सकाळी १० ते १०.३० या वेळेत साताऱ्याचे अभिजीत जाधव आणि सहकारी यांच्यासह स्वरसुगंध शहनाई ग्रुप (सातारा) प्रस्तुत सनई-चौघडा वादनाचे प्रत्यक्ष सादरीकरण होईल. सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत पुण्याचे कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेशबुवा जोशी धानोरकर यांचे श्री कालभैरव प्रकट दिन कीर्तन होणार आहे.

कालाष्टमीच्या दिवशी दुपारी १ ते ४ या वेळेत श्री गांधारेश्वर भेटीसाठी श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी ५ ते ७ वाजता कै. वामनराव साडविलकर संस्थापित स्वरदर्शन कलाकुंज, चिपळूण प्रस्तुत संगीत स्वरसुमनांजली अंतर्गत पद्मश्री श्रीनिवास खळे यांच्या जनशताब्दीनिमित्त त्यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गाण्यांचा कार्यक्रम रंगेल. याशिवाय रात्री ९ ते ११ वाजता चिपळूण तालुक्यातील ओझरवाडी येथील श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळाचा कार्यक्रम होईल.

महोत्सवाचा समारोप २ डिसेंबर रोजी लळीत कार्यक्रमाने होणार आहे. या दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ७ वाजता चिपळूणच्या वैश्यवसाहत येथील श्री श्रीराम प्रासादिक महिला संगीत भजन मंडळाचा कार्यक्रम होईल, तर सायंकाळी ७ ते ७.३० वाजता श्री वेस मारुती भेटीसाठी श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक निघेल. रात्री ९ ते १२.३० या वेळेत पुण्याचे कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेशबुवा जोशी धानोरकर यांचे लळीताचे कीर्तन होऊन महोत्सवाची सांगता होईल.