त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सडामिऱ्या येथील श्री नवलादेवी पावणादेवी मंदिरात भव्य दीपोत्सव उत्साहात संपन्न!

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सडामिऱ्या येथील श्री नवलादेवी पावणादेवी मंदिरात भव्य दीपोत्सव उत्साहात संपन्न!

शेकडो पणत्यांच्या प्रकाशाने आणि दिव्यांच्या आकर्षक आकृत्यांनी उजळला मंदिर परिसर; दर्शनासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी

रत्नागिरी :
त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन पर्वावर सडामिऱ्या येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री नवलादेवी पावणादेवी मंदिरात आज भव्य दीपोत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. शेकडो पणत्यांच्या लखलखाटाने आणि दिव्यांच्या माध्यमातून साकारलेल्या आकर्षक आकृत्यांनी संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी सडामिऱ्या व परिसरातील ग्रामस्थांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

गेल्या १० ते १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेला दीपोत्सव उपक्रम :
सडामिऱ्या गावातील श्री नवलादेवी पावणादेवी मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागृत देवस्थान मानले जाते. पंचायत समिती सदस्य परेश सावंत यांच्या विशेष सहकार्याने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या मंदिरात मागील १० ते १५ वर्षांपासून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदाही ही परंपरा कायम राखत ग्रामस्थांनी एकत्र येऊन या उत्सवाची जोरदार तयारी केली होती.

दिव्यांच्या मनमोहक आकृत्या ठरल्या ग्रामस्थांचे विशेष आकर्षण :
या दीपोत्सवानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण प्रांगणात शेकडो पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. तसेच, दिव्यांच्या साहाय्याने मंदिर परिसरात विविध कलात्मक व मनमोहक आकृत्या साकारण्यात आल्या होत्या. या विलोभनीय रोषणाईचे आणि दिव्यांच्या सजावटीचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांसह महिला व बालगोपालांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

Horizon techno.