सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी; अपात्रता टाळण्यासाठी राजीनाम्याचा वापर व बहुमत चाचणीबाबत महत्त्वाचे मुद्दे
नवी दिल्ली: Anti Defection Law Reform आणि देशातील राजकीय पक्षांतर व आमदार-खासदारांच्या राजीनाम्यांच्या माध्यमातून होणाऱ्या राजकीय घडामोडींना आळा घालण्यासाठी पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, भारतीय निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला नोटीस बजावत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
खंडपीठासमोर सुनावणी आणि महाराष्ट्रातील घटनांचा संदर्भ
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर पक्षांतरबंदी कायद्यातील बदलाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. मागील काही वर्षांत देशात राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली असून, पक्षांतरबंदी कायद्यातून पळवाट काढत काही आमदार-खासदारांनी आपल्याच पक्षात स्वतंत्र गट स्थापन करत पक्षावर दावा केल्याच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट देशपातळीवर चर्चेत राहून न्यायप्रविष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी पुढे आली आहे. ए. सेथू यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यांच्या वतीने आर. सतीश कुमार आणि जतीन यांनी बाजू मांडली.
अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी राजीनाम्याचा वापर?
आमदार आणि खासदारांकडून पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत होणारी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी राजीनाम्याचा वापर केला जात असल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीविरोधात पक्षांतराची तक्रार दाखल झाल्यानंतर किंवा अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींकडील निर्णयापूर्वीच राजीनामा देतात. त्यानंतर दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करून पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळत असल्याने पक्षांतरबंदी कायद्याचा मूळ उद्देशच निष्प्रभ ठरू शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

याचिकाकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
याचिकेत सर्वोच्च न्यायालयाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:
अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना दिलेला राजीनामा म्हणजे अपात्रतेची प्रक्रिया आपोआप संपुष्टात येऊ नये.
राजीनामा स्वेच्छेने आणि खरोखरच दिला आहे की राजकीय दबाव किंवा फायद्यासाठी दिला आहे, याची तपासणी व्हावी.
राजीनामा आणि अपात्रतेच्या याचिकांवर निश्चित कालमर्यादेत निर्णय घेण्याची व्यवस्था असावी.
विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींकडे असलेल्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेचे संस्थात्मक पुनरावलोकन व्हावे.
त्रिशंकू विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया केवळ विधिवत स्थापन झालेल्या सभागृहातच व्हावी.
बहुमत चाचणीबाबत संविधानातील अनुच्छेद १८८ चा संदर्भ
त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात असताना सरकार स्थापनेचा दावा केवळ बाहेरून सादर केलेली समर्थनपत्रे किंवा शक्तिप्रदर्शनाच्या आधारे मान्य करू नये, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर विधिवत स्थापन झालेल्या सभागृहातच बहुमताची चाचणी घेतली जावी, असे नमूद करत त्यासाठी संविधानातील अनुच्छेद १८८ चा संदर्भ देण्यात आला आहे. या याचिकेवर निवडणूक आयोग आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













