Paper Leak Law: राज्यात पेपर फोडणाऱ्यांवर १० कोटींचा दंड आणि १० वर्षांच्या कारावासाची शिफारस; उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर

Paper Leak Law: राज्यात पेपर फोडणाऱ्यांवर १० कोटींचा दंड आणि १० वर्षांच्या कारावासाची शिफारस; उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर

Paper Leak Law अंतर्गत मालमत्ता जप्ती, एसटीएफ (STF) तपास आणि विशेष न्यायालयांची तरतूद; एमपीएससी उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत देण्याचीही शिफारस

मुंबई: Paper Leak Law आणि राज्यातील भरती व स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी आपला दुसरा अहवाल शासनाला सादर केला आहे. या अहवालात पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकार करणाऱ्यांवर किमान १० कोटी रुपयांचा दंड, ७ ते १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि मालमत्ता जप्त करण्यासारख्या कठोर कायदेशीर तरतुदींची शिफारस करण्यात आली आहे. यासोबतच परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत देण्यासारखे विद्यार्थीहिताचे मोठे प्रशासकीय बदलही सुचवण्यात आले आहेत.

कठोर शिक्षा, दंड आणि विशेष न्यायालयांची तरतूद
मागील काही महिन्यांत एमपीएससी (MPSC) नोकरभरतीसह विविध परीक्षांमध्ये समोर आलेल्या पेपरफुटीच्या घटनांना चाप बसवण्यासाठी समितीने कठोर कायद्याचा मसुदा सुचवला आहे:

संघटित गुन्हेगारी: यामध्ये सहभागी व्यक्ती आणि संस्थांना ७ ते १० वर्षांचा कारावास, किमान १० कोटी रुपये दंड आणि मालमत्ता जप्तीची तरतूद सुचवण्यात आली आहे.

Anant hights

अनुचित साधनांचा वापर: परीक्षेत गैरप्रकार किंवा अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची शिफारस आहे.

सेवा पुरवठादार संस्था: गैरप्रकारात सहभागी असलेल्या संस्थांना ५ कोटी रुपयांपर्यंत दंड आणि ८ वर्षांसाठी बंदी घालण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तपास आणि खटले: परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करणे, गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी विशेष कृती दल (STF) स्थापन करणे आणि खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

एमपीएससी उमेदवारांना मोठा दिलासा
उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींमुळे एमपीएससी परीक्षार्थींना आर्थिक आणि प्रशासकीय पातळीवर मोठा दिलासा मिळणार आहे. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस करण्यात आली असून, उत्तरतालिकेवरील उमेदवाराची हरकत योग्य ठरल्यास हरकतीसाठी भरलेले शुल्कही परत मिळणार आहे. याशिवाय दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करणे आणि उमेदवारांसाठी आधार किंवा ‘MahaID’ द्वारे एकदाच नोंदणीची (One Time Registration) सुविधा देण्याची सूचना करण्यात आली आहे.

परीक्षा प्रक्रियेत मोठे प्रशासकीय आणि तांत्रिक बदल
राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया सुधारण्यासाठी ४ सप्टेंबर २०२६ रोजी स्थापन करण्यात आलेल्या या समितीने संपूर्ण यंत्रणा पारदर्शक करण्यासाठी महत्त्वाचे बदल सुचवले आहेत:

मागणीपत्र व पोर्टल: रिक्त पदांची माहिती वेळेत मिळण्यासाठी ‘Integrated Requisition Portal’ विकसित करणे आणि सप्टेंबरअखेरपर्यंत विभागांनी भरतीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हास्तरीय यंत्रणा: जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करणे, परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक (Venue Bank) तयार करणे आणि केंद्रांची निवड व व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची शिफारस आहे.

निगराणी व सायबर सुरक्षा: परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणे आणि सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान व सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आली आहे.