Sayaji Shinde on Tree Felling: सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे आक्रमक; ३ डिसेंबरला पुण्यात मोर्चाची घोषणा

Sayaji Shinde on Tree Felling: सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे आक्रमक; ३ डिसेंबरला पुण्यात मोर्चाची घोषणा

भीमाशंकर व तारळी प्रकल्पांच्या परवानग्यांवर प्रश्नचिन्ह; कंपनीवर कारवाई व प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Sayaji Shinde on Tree Felling प्रकरणात महाराष्ट्रातील वृक्षतोड आणि पर्यावरणाला होत असलेल्या त्रासाबद्दल अभिनेते व पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वीज प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, भीमाशंकर आणि तारळी येथील पंप स्टोरेज प्रकल्पांसाठी पर्यावरण आणि वन विभागाच्या आवश्यक परवानग्या नसतानाही गेल्या दोन वर्षांपासून डोंगर पोखरून अतिदुर्मिळ झाडांची कत्तल सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणी ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, कंपनीला काळ्या यादीत टाकावे आणि हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी मागणी सयाजी शिंदे यांनी केली आहे. एकही झाड न तोडता आणि पर्यावरणाचा ऱ्हास न करता वीज प्रकल्प राबवले जावेत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Sayaji Shinde on Tree Felling: कायदेशीर नोटीस आणि ३ डिसेंबरला पुण्यात मोर्चा
पर्यावरणाच्या रक्षणासाठी सयाजी शिंदे यांनी प्रत्यक्ष आंदोलनाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी वकिलामार्फत जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारला संबंधित कंपनीच्या दोषींवर कारवाई करण्याबाबत सार्वजनिक कायदेशीर नोटीस बजावली आहे.

Amey jwelrs

तसेच, येत्या ३ डिसेंबर रोजी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा सयाजी शिंदे यांनी केली आहे. कोकणासह संपूर्ण सह्याद्रीच्या पट्ट्यातील जैवविविधतेच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा मानला जात आहे. झाडे आणि पुढची पिढी वाचवण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.