Kon Honaar Crorepati च्या नव्या पर्वात सेलिब्रिटी पाहुण्यांची रेलचेल; मराठी कलाकार व सामान्य स्पर्धकांना प्राधान्य देण्याची मागणी
मुंबई : Kon Honaar Crorepati (कोण होणार करोडपती) या लोकप्रिय रिॲलिटी शोच्या सध्याच्या पर्वाबाबत मराठी प्रेक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात असून, कार्यक्रमाचा मूळ उद्देश बाजूला पडत असल्याची भावना सोशल मीडियावर उमटत आहे. सर्वसामान्य माणसाच्या ज्ञानाला आणि बुद्धिमत्तेला व्यासपीठ मिळवून देणारा कार्यक्रम म्हणून या शोची ओळख आहे. मात्र, यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित करत असताना हिंदी आणि भोजपुरी मनोरंजनविश्वातील पाहुण्यांच्या वाढत्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
आतापर्यंत या पर्वात अभिनेत्री फराह खान, यामी गौतम, रवीना टंडन, भोजपुरी अभिनेता रवी किशन आणि प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर भुवन बाम यांनी हजेरी लावली आहे. या कलाकारांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला वेगळी झळाळी मिळाली असली, तरी एका मराठी कार्यक्रमात हिंदी व भोजपुरी कलाकारांना वारंवार निमंत्रित करण्याऐवजी मराठी कलाकारांना अधिक संधी द्यायला हवी, असे मत अनेक प्रेक्षकांनी मांडले आहे. तसेच सामान्य मराठी स्पर्धकांच्या संघर्षकथा आणि त्यांच्या ज्ञानाला अधिक महत्त्व मिळायला हवे, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
Kon Honaar Crorepati च्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि जुन्या पर्वांची आठवण
कार्यक्रमाचे प्रोमो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी ‘अरे सोनी मराठीवर कशाला सुरू केला मग शो?’ असा सवाल विचारला, तर काहींनी ‘कार्यक्रम मराठी आणि सगळे हिंदी, भोजपुरी कलाकार बोलवत आहात. बंद करा शो किंवा हिंदी चॅनेलवर फिरवा हा शो’ अशा शब्दांत नाराजी नोंदवली. हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना व्यासपीठ देण्याऐवजी हिंदी चित्रपटांच्या प्रमोशनचे माध्यम बनत चालला आहे का, असा प्रश्नही काही प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.

यापूर्वी ‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले होते. त्या पर्वांमध्ये सामान्य स्पर्धकांचे संघर्ष, अनुभव आणि ज्ञानाचा प्रवास पाहायला मिळत होता, त्यामुळे यंदाच्या पर्वात सेलिब्रिटी पाहुण्यांची संख्या पाहून प्रेक्षकांकडून जुन्या पर्वांची आठवण काढली जात आहे.
माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनाबाबत उत्सुकता; आगामी भागांकडे लक्ष
माधुरी दीक्षितसारखी लोकप्रिय अभिनेत्री या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असल्याने सुरुवातीला प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र, आता पाहुण्यांच्या निवडीवरून कार्यक्रमाला टीकेचा सामना करावा लागत आहे. प्रेक्षकांच्या या नाराजीनंतर निर्माते आगामी भागांमध्ये मराठी कलाकार आणि सामान्य स्पर्धकांना अधिक प्राधान्य देणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.













