साखर, मीठ व फॅटचे अधिक प्रमाण असल्यास पॅकेटच्या दर्शनी भागावर ३ षटकोन छापणे बंधनकारक; १० आठवड्यांत मसुदा नियमांचा आढावा
Food warning labels लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (FSSAI) महत्त्वाचे निर्देश दिले असून, पॅकेटबंद खाद्यपदार्थांमध्ये मीठ, साखर आणि सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण अधिक असल्यास ग्राहकांना पॅकेटच्या दर्शनी भागावरच धोक्याचा इशारा देणारे स्पष्ट लेबल दाखवावे लागणार आहे. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने नवी दिल्ली येथे याप्रकरणी सुनावणी घेताना नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम तातडीने तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
निकष आणि कमाल मर्यादेबाबत न्यायालयाची स्पष्ट भूमिका
केवळ वरून मिसळलेली साखर किंवा फॅट विचारात न घेता, खाद्यपदार्थात असलेली एकूण साखर आणि सॅचुरेटेड फॅट यालाच इशाऱ्याचा निकष मानण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मीठ, एकूण साखर आणि सॅचुरेटेड फॅटची कमाल मर्यादा नव्याने निश्चित केली जावी, असे खंडपीठाने नमूद केले. ही मर्यादा इतकी कमी नसावी की प्रत्येक पॅकेटवरच इशारा छापावा लागेल आणि इतकीही जास्त नसावी की आरोग्याला हानी पोहोचवणारे घटक त्यातून सुटून जातील, असे न्यायालयाने सांगितले.
पॅकेटवर ३ षटकोन आणि किमान ४ ते ५ टक्के जागा आवश्यक
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार, खाद्यपदार्थाच्या पॅकेटच्या मुख्य दर्शनी भागावर ३ स्वतंत्र षटकोन (Hexagon) तयार करावेत आणि त्यामध्ये अनुक्रमे ‘High Fat’, ‘High Sugar’ आणि ‘High Salt’ असे स्पष्टपणे नमूद करावे. प्रत्येक षटकोनाने पॅकेटच्या मुख्य क्षेत्राच्या किमान ४ ते ५ टक्के जागा व्यापणे आवश्यक आहे. तसेच या षटकोनांमधील शब्दांचा फॉन्ट सर्वसामान्य ग्राहकांना सहज वाचता येईल इतका मोठा आणि स्पष्ट असावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

मसुदा नियम आणि प्रकरणाची पार्श्वभूमी
मुले आणि सर्वसामान्य नागरिकांना पॅकेटबंद खाद्यपदार्थांतील पोषक घटक व त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत जागरूक करणे अत्यंत गरजेचे असल्याचे खंडपीठाने अधोरेखित केले. या निर्देशांच्या आधारे FSSAI ने मसुदा नियम (Draft Rules) तयार करून संबंधित घटकांकडून सूचना व हरकती मागवाव्यात आणि हे नियम लवकरात लवकर अंतिम करून अधिसूचित करावेत, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. फ्रंट ऑफ पॅकेट वॉर्निंग लेबल (FOPL) लागू करण्याबाबत ‘3S अँड अवर हेल्थ सोसायटी’ या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी सुरू असून, यापूर्वीही विलंबावरून न्यायालयाने FSSAI ला खडसावले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० आठवड्यांनंतर होणार असून, त्यावेळी मसुदा नियमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल.













