Land records reform: भूमि अभिलेख विभागाच्या २० सेवांचे ६ मुख्य सेवांमध्ये सुसूत्रीकरण; महसूल विभागाचा आदेश जारी

Land records reform: भूमि अभिलेख विभागाच्या २० सेवांचे ६ मुख्य सेवांमध्ये सुसूत्रीकरण; महसूल विभागाचा आदेश जारी

ऑनलाइन पोर्टल, ‘आपले सरकार’ व ‘मैत्री’वर सेवा उपलब्ध; अनावश्यक कागदपत्रांची प्रती देणाऱ्या सेवा बंद

Land record services अधिक जलद, स्पष्ट आणि सोप्या मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने भूमि अभिलेख विभागाच्या कामाची पद्धत बदलून ती अधिक सुटसुटीत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून, यापूर्वीच्या २० सेवांचे एकत्रिकरण, काही सेवा बंद करणे आणि एका नव्या सेवेची भर घालून एकूण ६ मुख्य सेवा निश्चित करण्यात आल्या आहेत. नियोजन विभागाच्या नियमांप्रमाणे आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मंजुरीनंतर २६ नोव्हेंबर रोजी मुंबईतून महसूल विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला.

कोणत्या ६ मुख्य सेवांचा समावेश?
नागरिकांसाठी, सरकारी विभागांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी असलेल्या या ६ सेवा ऑनलाइन पोर्टल, ‘आपले सरकार’ आणि ‘मैत्री’ पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये पुढील सेवांचा समावेश आहे:

सगळ्या प्रकारची जमीन मोजणी (काम पूर्ण झाल्यावर मोजणी नकाशाची ‘क’ प्रत देणे)

Shitit jyotish

आकारफोड / कमी-जास्त पत्रक तयार करणे आणि नकाशात दुरुस्ती करणे

सगळ्या प्रकारच्या फेरफार नोंदी

ऑनलाइन नसलेले नकाशे किंवा जुने कागदपत्र उपलब्ध करून देणे

मिळकत पत्रिकेचे भाग पाडून स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे

भूसंपादनामध्ये रस्ता, रस्ता सेट बॅक आणि आरक्षित जागेसाठी स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे

कोणत्या सेवा बंद केल्या आणि नवी सेवा कोणती?
ज्या जुन्या नोंदी किंवा कागदपत्रांचे स्कॅनिंग व संगणकीकरण होऊन ती आधीच ऑनलाइन दिसतात, अशा कागदपत्रांच्या प्रती देणाऱ्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये मिळकत पत्रिका, मुंबई उपनगर मिळकत पत्रिका, टिपण, क्षेत्रबुक, प्रतिबुक, शेतपुस्तक, जबाब, फाळणी, आकारबंद, गटनकाशा, मोजणी नकाशा आणि अपील निकालाच्या नकला या सेवांचा समावेश आहे.

दुसरीकडे, नेहमीची आणि घाईची मोजणी, वेगवेगळ्या प्रकारची आकारफोड, कमी-जास्त पत्रकाला मंजुरी, सगळ्या प्रकारच्या फेरफार नोंदी, मिळकत पत्रिकेचे भाग पाडणे आणि भूसंपादनाची स्वतंत्र मिळकत पत्रिका यांसारख्या सारख्याच कामांच्या सेवा एकत्र केल्या आहेत. तसेच, जे मूळ कागदपत्र किंवा नकाशे अद्याप ऑनलाइन नाहीत, त्यांचे स्कॅनिंग आणि माहिती भरून ती ‘ई-महाभूमी’ पोर्टलवर टाकण्याची नवी सेवा सुरू करण्यात आली आहे.

अपील व्यवस्था, अंमलबजावणी आणि मंत्र्यांची प्रतिक्रिया
या कामांबाबत काही तक्रार किंवा अपील करायचे असल्यास पहिल्या अपीलासाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख किंवा उप अधीक्षक भूमि अभिलेख / नगर भूमापन अधिकारी हे प्राधिकृत असतील, तर दुसऱ्या अपीलासाठी उपसंचालक भूमि अभिलेख यांच्याकडे दाद मागता येईल. हा निर्णय प्रभावीपणे राबवण्यासाठीचे नियम व तांत्रिक सूचना जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (पुणे) देतील, तर ऑनलाइन व्यवस्था तयार करून ती जोडण्याचे काम भूमि अभिलेख विभाग आणि ‘महाआयटी’ करतील.

नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात मिळाव्यात यासाठी काम सुरू असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. २० सेवांचे सुसूत्रीकरण करून ६ प्रमुख सेवांमध्ये रूपांतर केल्याने अनावश्यक कागदपत्रे, फेऱ्या आणि मंजुरीचे टप्पे कमी होतील तसेच सर्व सेवा कालबद्ध पद्धतीने उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले आहे.