Chiplun assault case प्रकरणात तिघे गंभीर जखमी; अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने सुनावली सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
Chiplun assault case अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील गोवळकोट परिसरातील बायपास एन्रॉन पूल येथे बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सात जणांनी मिळून पाच जणांवर धारदार कोयता आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी सानिया फैजान चौगुले (वय २२, रा. खेर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे.
गुन्हा दाखल झालेले आणि अटक केलेले आरोपी
या हल्ल्याप्रकरणी अब्दुल बाबासाहेब शेख (६७), खालीद अब्दुल शेख (४२), साहिल अब्दुल शेख (३१), शाहिद अब्दुल शेख (२१), सिकंदर अब्दुल शेख (४५, सर्व रा. आफ्रिन पार्क, गोवळकोट), रुबीना जमीर मुजावर (३८, रा. गोवळकोट रोड) आणि अमन फारुख शेख (२४, रा. अस्मीना अपार्टमेंट, गोवळकोट रोड) या सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर सर्व सातही आरोपी पसार झाले होते. यापैकी अब्दुल शेख, अमन शेख आणि रुबीना मुजावर या तिघांना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. या मारहाणीत रोहन साबळे, फैजान चौगुले, सऊद चौगुले, सलमा चौगुले आणि सानिया फैजान चौगुले (सर्व रा. खेर्डी) हे पाच जण जखमी झाले असून, त्यातील रोहन साबळे, फैजान चौगुले आणि सऊद चौगुले हे तिघे गंभीर जखमी आहेत.
भेंडीनाका येथील वादातून हल्ल्याची घटना
फिर्यादी सानिया यांनी फैजान चौगुले यांच्याशी प्रेमविवाह केला आहे. बुधवारी सानिया व फैजान हे भेंडीनाका येथून जात असताना त्यांची दुचाकी बंद पडली. त्यावेळी अब्दुल शेख त्यांच्याकडे बघून हसला. याबाबत फैजान याने विचारणा केली असता, अब्दुल शेख याने फैजान यांचा शर्ट पकडून धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.

या घटनेची माहिती सानिया यांनी आपल्या सासूला फोनवरून दिली आणि कुटुंबातील सदस्यांना भेंडीनाका येथे येण्यास सांगितले. त्यावेळी सलमा चौगुले यांनी फैजान यांना फोनवरून सांगितले की, वरील सात जण आम्हाला गोवळकोट बायपास एन्रॉन पुलाजवळ कोयता आणि लोखंडी रॉडने मारहाण करत आहेत. त्यानुसार फैजान व सानिया हे दोघेजण घटनास्थळी पोहोचले असता, या सातही जणांनी त्या दोघांसह इतर तिघे अशा एकूण पाच जणांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.













