Delimitation वर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा; मात्र विधेयकाच्या पद्धतीवर पृथ्वीराज चव्हाण यांचा आक्षेप
Delimitation म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना ही घटनात्मक प्रक्रिया असून ती करावीच लागते आणि तिला पर्याय नसतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. अनौपचारिक चर्चेत शरद पवार यांनी मतदारसंघ पुनर्रचना गरजेची असल्याचे सांगितल्याचे नमूद करत, डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती देताना उद्या किंवा परवा त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. आठ खासदारांना घेऊन सुप्रिया सुळे यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, १९८६ पासून आपण शरद पवार यांच्यासोबत कार्यरत असल्याने निष्ठा काय असते हे आपल्याला ठाऊक आहे. शरद पवार यांना आपण दैवत मानत असून त्यांची जी भूमिका आहे तीच आपली भूमिका राहील आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Delimitation विधेयकावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा आक्षेप
दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी डिलिमिटेशन विधेयक लपूनछपून आणि मागच्या दाराने आणले जात असल्याची टीका केली आहे. डिलिमिटेशन हा घटनेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असला तरी लोकसभेतील ५० टक्के जागा वाढविण्यास विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डिलिमिटेशनच्या विरोधात नसलो तरी तुलनात्मक खासदार संख्या बदलू नये, तसेच जागा न वाढविता उत्तर प्रदेश निवडणुकीपासून महिला आरक्षण त्वरित लागू करावे, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली. विधेयक संदर्भातील काही मुद्द्यांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.













