*संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे येथे रिक्षाला साईड न देण्याच्या वादातून राडा! लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत शेतकरी जखमी; पोलीस पाटलासह ६ जणांविरुद्ध देवरूख पोलिसांत गुन्हा दाखल*

*संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे येथे रिक्षाला साईड न देण्याच्या वादातून राडा! लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत शेतकरी जखमी; पोलीस पाटलासह ६ जणांविरुद्ध देवरूख पोलिसांत गुन्हा दाखल*

ताम्हाणे बौद्धवाडी येथील घटना; लोखंडी रॉडने डोक्यात व कुशीवर वार करून केले जखमी, नंतर कंपाऊंड तोडण्यावरून जमाव अंगावर धावला

संगमेश्वर (रत्नागिरी) :
संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे बौद्धवाडी येथे रिक्षाला साईड न देण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते ७.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेत एका ४० वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यात आणि डाव्या कुशीवर लोखंडी रॉडने वार करून जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात ताम्हाणे गावचे पोलीस पाटील यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षाला साईड न दिल्याचा जाब विचारताच लोखंडी रॉडने हल्ला :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर सिताराम जाधव (वय ४० वर्षे, व्यवसाय- शेती, रा. ताम्हाणे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) हे गुरुवारी सायंकाळी ६.०० वाजता देवरूख बाजारपेठेतून किराणा जिन्नस खरेदी करून गावातील अमर रामचंद्र सावंत यांच्या रिक्षाने घरी परतत होते. सायंकाळी ७.०० च्या सुमारास ताम्हाणे बौद्धवाडी येथे आल्यानंतर पुढे रिक्षा सावकाश चालवत असलेले आरोपी क्र. १ शैलेश सदानंद जाधव (वय ४४) हे फिर्यादींच्या रिक्षाला साईड देत नव्हते. फिर्यादी घरी पोहोचल्यानंतर सामान घरात ठेवून याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता, आरोपी क्र. ४ प्रतिक विजय जाधव याच्या घराच्या गेटसमोर शैलेश जाधव भेटले. फिर्यादी समीर जाधव यांनी "तू आमच्या रिक्षेला साईड का दिली नाहीस?" अशी विचारणा केली असता, शैलेश जाधव याने लोखंडी रॉडने फिर्यादींच्या डोक्यात व डाव्या कुशीवर मारून तेथून निघून गेला.

कंपाऊंड तोडण्याचा प्रयत्न; पोलीस पाटलासह इतरांचा अंगावर धावून जाण्याचा प्रकार :
या मारहाणीमुळे संतापलेल्या फिर्यादी समीर जाधव यांनी आपल्या मालकीच्या गोठ्यातून लोखंडी टिकाव आणला आणि आरोपी प्रतिक जाधव याच्या घराच्या कंपाऊंडचे चिऱ्याचे बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आरोपी संतोष आनंत जाधव (वय ३८, ताम्हाणे गावचे पोलीस पाटील), मनोज महेंद्र जाधव (वय ४३), प्रतिक विजय जाधव (वय ३४), विजय सखाराम जाधव (वय ५९) आणि शेखर जयराम जाधव (वय ५०, सर्व रा. ताम्हाणे बौद्धवाडी) यांनी तेथे येऊन बेकायदा जमाव जमवला आणि फिर्यादींना मारण्यासाठी अंगावर धावून गेले. यावेळी फिर्यादींच्या पत्नी सौ. अंजली समीर जाधव यांनी तात्काळ मध्यस्थी करत त्यांना तेथून बाजूला नेले आणि वाडीतील अजित सावंत यांच्या चारचाकी वाहनाने उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Pednekar sankul

देवरूख पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद :
रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर फिर्यादी समीर जाधव यांनी शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.४८ वाजता दिलेल्या जबाबावरून देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८३/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), १८९(२), १९० आणि १३१ अन्वये सहाही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून देवरूख पोलीस पुढील तपास करत आहेत.