लांजा : एकीकडे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून पथनाट्य, रांगोळी व अन्य प्रकारे जनजागृती केली जात असताना दुसरीकडे कोत्रेवाडी ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेल्या बहिष्काराबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती व्हावी आणि मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून मतदान करावे यासाठी सध्या प्रशासनाकडून विविध मार्गाने प्रचार केला जात आहे. यामध्ये पथनाट्य, रांगोळी व अन्य माध्यमांतून लोकांना मतदान करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. दुसरीकडे प्रशासनाला निवेदन देऊन महिन्याभराचा कालावधी उलटून गेला तरी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी निवडणुकीवर टाकलेल्या बहिष्काराबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून भूमिका घेण्यात आलेली नाही.
लोकांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा यासाठी त्यांच्याशी कोणतीही चर्चा प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोत्रेवाडीवर जबरदस्तीने जो घनकचरा प्रकल्प लादण्यात आला, त्या प्रकल्पाला आमचा पहिल्यापासून प्रचंड विरोध होता आणि आहे. विरोधासाठी आम्ही आंदोलनाची हत्यारे उपसून सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केले. प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी आम्ही या निवडणुकीत मतदान करावयाचे नाही, असा एकमुखी निर्णय घेतला आहे. सतीश पेडणेकर, रहिवासी कोत्रेवाडी,
शहरातील कोत्रेवाडीत होऊ घातलेला घनकचरा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने आणि जबरदस्तीने लादला गेला आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन दिले त्या निवेदनाची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. मतदान वाढीसाठी कागदावर प्रयत्न करायचा, मात्र ज्यांची निवेदन आली आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे असा प्रकार सध्या सुरू असल्याचे दिसते. – मंगेश आंबेकर, प्रकल्प विरोधी नेते, लांजा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 13/Nov/2024














