रत्नागिरी : जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत प्रतिपालकत्व योजनेबाबत कार्यशाळा

रत्नागिरी : जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत प्रतिपालकत्व योजनेबाबत एकदिवसीय कार्यशाळा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या कार्यशाळेला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, समृद्धी अजय वीर, बालकल्याण समितीचे सदस्य शिरीष दामले, अॅड. रजनी सरदेसाई, अॅड. प्रिया लोवलेकर, डॉ. स्नेहा पिलणकर तसेच कार्यशाळेचे प्रशिक्षक म्हणून कॅटलिस्ट फॉर सोशल अक्शन, मुंबई येथील नियती त्रिवेदी व युनिसेफच्या रिणी भार्गव यांची उपस्थिती होती. कार्यशाळेमध्ये प्रतिपालकत्व सेवा या योजनेचा लाभ विविध शासकीय व खासगी संस्थेतील बालक तसेच संस्थेबाहेरील अनाथ व गरजू बालकांना कशा पद्धतीने मिळवून दिला जाऊ शकतो, याबद्दल विचार मंथन करण्यात आले. कार्यशाळेचा उद्देश फॉस्टर केअरसंदर्भात जिल्ह्यासाठी कृती आराखडा तयार करणे हा असून, फॉस्टर केअर ही सेवा योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक उपाय योजना, आवश्यक साहाय्य, समुदायात जनजागृतीचे माध्यम यावर चर्चा करण्यात आली.

या कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून कॅटलिस्ट फॉर सोशल अक्शन, मुंबई या सामाजिक संस्थेच्या नियती त्रिवेदी व यूनीसेफच्या रिणी भार्गव यांनी फॉस्टर केअर याविषयी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. फॉस्टर केअर ही बालकांच्या पालनपोषणासाठी तात्पुरती व्यवस्था असून ती दत्तक विधान या प्रक्रियेपेक्षा वेगळी आहे. यामध्ये पालक तात्पुरत्या स्वरूपात बालकाचे पालन पोषण करण्याची जबाबदारी बालकल्याण समितीच्या आदेशाने स्वीकारू शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 25/Sep/2024