Breaking : रत्नागिरी मेडिकल कॉलेज राज्यात प्रथम

रत्नागिरी, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष एमबीबीएस परीक्षेत 99 टक्के गुण मिळवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथम स्थान पटकावले आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने प्रथम वर्ष एमबीबीएसचा निकाल काल 24 सप्टेंबर रोजी जाहीर केला. यामध्ये राज्यातील पहिल्या ५ वैद्यकीय महाविद्यालयांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी 99 टक्के, आर्म फोर्सेस मेडीकल कॉलेज, पुणे 96 टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, 95.30 टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर 95.30 टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर 95.20 टक्के, बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे 95.18 टक्के.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या पहिल्या तुकडीतील शरीररचना शास्त्रात 1, शरीरक्रीयाशास्त्रमध्ये 2 आणि जीवरसायनशास्त्र मध्ये 15 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. एमबीबीएसच्या पहिल्याच तुकडीने मिळविलेल्या या घवघवीत यशामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी व अध्यापक वर्गाचे विशेष कौतुक केले. यशाची ही वाटचाल अशीच पुढे चालू ठेवून जिल्ह्याच्या नाव लौकीकात भर घालावी, अशा शब्दात पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.