शाळकरी मुलीला पळवून नेवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी, ५० हजार रुपये दंड; चिपळूण विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

रत्नागिरी : चिपळूण येथील १४ वर्षाच्या शाळकरी मुलीला पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी संदेश सोमा बारे रा. गोंधळे, ता. चिपळूण यास चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि रु. ५० हजार दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पी‍डित मुलीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा न्यायालयाने आदेश केला.

चिपळूण येथील एका १४ वर्षाच्या शाळकरी मुलीला दि. ४ ऑगस्ट २०१९ रोजी पळवून नेवून आरोपी संदेश सोमा बारे याने वेगवेगळया ठिकाणी तसेच जंगलमय भागात नेवून वेळोवेळी बलात्कार केला. पीडित मुलीच्या आईने चिपळूण पोलीस स्टेशनला मुलगी हरवल्याबाबत तक्रार दिली होती. त्यामुळे सुरुवातीला भा.दं.वि. कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांना मुलीच्या शोध मोहिमेनंतर सुमारे ७ दिवसांनी पीडित मुलगी एका निर्जन ठिकाणी पडीक घरात आरोपीने नेवून ठेवल्याचे आढळले.

त्यामुळे पीडित मुलीला आणि आरोपी यांना पोलीसांनी पोलीस स्टेशनला आणले आणि पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यात आला. जबाबात आरोपीने पी‍डित मुलगी १४ वर्षाची आहे हे माहीत असताना देखील तिला पळवून नेल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीने बलात्कार केल्याचे निष्पन झाले. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर गुन्ह्यास भा.दं.वि. कलम ३७६ (३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याचे कलम ४, ८ वाढविण्यात आले. त्यानंतर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यावर चिपळूण पोलीसांनी न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोप दाखल केले.

या सत्र खटल्याची सुनावणी चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्यासमोर सुरु होती. पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, गुन्ह्याचे तपास अधिकारी यांच्यासह एकूण १० साक्षीदारांची महत्त्वपूर्ण साक्ष विशेष सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी घेतली. या कामी सरकारी वकील यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद मांडला व त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी संदेश सोमा बारे यास विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी भा.दं.वि. कलम ३७६, ३६३ तसेच पोक्सो कायदा कलम ४, ८ अन्वये दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपीने दंड भरल्यास ही दंडाची सर्व रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश देण्यात आला.

या निकालाने पीडितेच्या नातेवाईकांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.
आठवडाभरापूर्वीच अन्य एका अशाच स्वरुपाच्या खटल्यात डॉ. अनिता एस. नेवसे यांनी १३ वर्षाच्या शाळकरी मुलीवर मातृत्त्व लादणाऱ्या आरोपीस शिक्षा ठोठावली होती. अशा न्यायनिर्णयामुळे लहान मुलींवरील होणाऱ्या लैंगिक अत्याचारात मोठी घट होईल, असे मत समाजात सर्व स्तरावरुन व्यक्त केले जात आहे.

पोक्सो कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याची प्रतिक्रीया सरकारी वकीलांनी व्यक्त केली.
या सत्र खटल्याकामी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले तसेच तपास अंमलदार पोलीस निरीक्षक संदिप वांगणेकर यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला व पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण यांनी काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:21 28-04-2026