Badlapur Encounter : ‘पोलिसांनी एन्काऊंटर करून चांगलेच केले’; शर्मिला ठाकरेंनी घेतली जखमी पोलिसांची भेट

मुंबई : राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लहान मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.

या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली. यानंतर आता या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, या सुनावणीत न्यायालाने पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या एन्काउंटरचे समर्थन केले आहे.

शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदे चकमक प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे यांची भेट घेतली. यानंतर मीडियाशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, मला एक मेसेज आला आहे. तो वाचून दाखवते. एन्काउंटर केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन. जाणूनबुजून एन्काउंटर केले असेल, तर पोलिसांचे डबल अभिनंदन. ते एन्काउंटर कसेही असले, तरी महिलांवर अत्याचार एवढे वाढले आहेत की, जोपर्यंत कायद्याचा असा धाक निर्माण होत नाही, तोपर्यंत अशा गोष्टींवर वचक बसणार नाही. असे एन्काउंटर वरचेवर झाले पाहिजेत, असे माझे मत आहे, असे शर्मिला ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

पोलिसांचे खास अभिनंदन करण्यासाठी आले

पोलिसांचे खास अभिनंदन करण्यासाठी आले आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाची व्यक्ती किंवा राज ठाकरे यांची पत्नी म्हणून बोलत नाही. मी एक महिला म्हणून बोलत आहे. मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते आहे. आमच्यात इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दररोज अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अत्याचार, खून वाढले आहेत. त्यामुळे महिलांची प्रतिनिधी म्हणून बोलते. राजकारणी काय बोलतात, विरोधक काय बोलतात, न्यायालय काय म्हणते, मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. मला पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, पोलिसांनी एन्काऊंटर करून चांगलेच केले, असे स्पष्ट मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले.

महिलांवर होणारे अत्याचार लोकशाहीला मारक नाहीत का?

महिलांवर होणारे अत्याचार लोकशाहीला मारक नाहीत का? वेगाने महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. मी मागच्या महिन्यात तीन पीडित महिलांना भेटली आहे. हे लोकशाहीला पूरक आहे का? हैदराबादमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला चार पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. आज जे रोज सकाळी बोंबलतात, त्याच पोलिसांनी आपल्या वर्तमानपत्रात पोलिसांचे कौतुक केले होते. मग हैदराबादच्या पोलिसांना एक न्याय आणि महाराष्ट्राच्या पोलिसांना वेगळा न्याय देऊन कसा चालेल, जर त्यांचे कौतुक होते, तर यांचेही कौतुकच झाले पाहिजे, असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायची असेल, तर असे एन्काउंटर झाले पाहिजेत. पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत. त्या लहान मुलींनी त्याला ओळखलेले आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. म्हणजेच या प्रकरणात अक्षय शिंदेविरोधात पोलिसांकडे पुरावे नाहीत, असे नाही. दिल्लीच्या क्राइममध्ये सहा वर्षांनी शिक्षा झाली. आपण शक्ती कायदा फक्त बोलतो, आम्हाला हा शक्ती कायदा हवा, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 25-09-2024