‘जिल्हा रत्नागिरी विकास पर्व’: कॉफी टेबल बुकचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन

रत्नागिरी : जिल्ह्यातील विकासाची वाटचाल दाखविणाऱ्या ‘जिल्हा रत्नागिरी विकास पर्व’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, सहायक जिल्हाधिकारी डॉ. जास्मिन, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी झालेली विकास कामे यांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. ड्रोनच्या उत्तम नजरेतून टिपलेली दृश्यं आणि क्यु आर कोडच्या माध्यमातून चित्रीकरण देखील मोबाईलवर पाहता येणार आहे. हे या कॉफी टेबल बुकचे वैशिष्ट्य आहे.

जिल्हा रत्नागिरी विकास पर्व निर्मितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष परिश्रम घेतले आहेत. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. अशा शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढेही प्रशासन यंत्रणा गतिमान असेल. हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून निश्चितच उपयुक्त ठरणारे आहे. जिल्ह्यामध्ये येणारे पर्यटक, अभ्यासक यांनाही फायदेशीर ठरणार आहे.

या पुस्तकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:06 26-09-2024