कर्देचा सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून दिल्लीमध्ये आज गौरव

दापोली : यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन गाव स्पर्धेच्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्रातील कर्दे गावाची कृषी पर्यटन श्रेणीतील सर्वोत्तम पर्यटन गावांपैकी एक म्हणून निवड करण्यात आली आहे. जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबरला नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना सन्मानित केले जाईल. दापोली तालुक्यातील कर्दे गावाला मान मिळाल्याने सर्वच स्तरावरून गावातील सरपंच, सर्व शासकीय, प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.

पर्यटन मंत्रालय सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा आयोजित करते, त्यामध्ये २०२४ च्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेच्या आवृतीमध्ये तालुक्यातील कर्दे गावाची कृषी पर्यटन गावापैकी सर्वोत्तम पर्यटन एक म्हणून निवड करण्यात आली आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरपंच सचिन तोडणकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. यापूर्वी मार्च २०२४ मध्ये केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून “बेस्ट टुरिझम व्हिलेज २०२४” या स्पर्धेत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे या गावाची निवड करण्यात आली होती.

रत्नागिरीत समुद्रकिनारी वसलेले कर्दे हे गाव पर्यटकांचे आकर्षण आहे. स्वच्छ समुद्रकिनारा, पांढरी वाळू तसेच बीचवर असणारे वॉटरस्पोर्टस् या गावाचे खास वैशिष्ट्य आहे. बहुतांशी पर्यटक या ठिकाणी या बीचवर मजा करण्यासाठी आवर्जून घेतात. त्यामुळे दापोली तालुक्यामध्ये मुरूड किनाऱ्याला लागून असलेला कर्दे बीच खूपच प्रसिद्ध आहे. त्यावेळी देखील केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून या स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे १२६ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यावेळी ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली होती. यामध्ये एकूण १८७ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेअंतर्गत कर्दे गावातील पर्यटन उद्योग, कृषी पर्यटन, आर्थिक सक्षमीकरण, महिलांचे सबलीकरण, जैवविविधता, उद्योग, दळणवळण, नैसर्गिक स्रोत वापरून केलेले जलव्यवस्थापन, सांस्कृतिक वातावरण, पर्यटन उद्योग आधारित रोजगार, आदी गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले आहे. नैसर्गिक स्रोतांचा वापर कशा प्रकारे करण्यात आला, याचे सादरीकरण करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 27/Sep/2024