Mamata Banerjee : ‘मला काढून टाका, पण मी राजीनामा देणार नाही’ – ममता बॅनर्जी

Mamata Banerjee: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Election Result 2026) अनपेक्षित निकालानंतर राज्याचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. 15 वर्षांची सत्ता गेल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, आपण पदाचा राजीनामा देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

कालीघाट येथे पार पडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी भाजपवर (BJP) ‘निवडणूक लुटल्याचा’ खळबळजनक आरोप केला आहे.

Mamata Banerjee: “मला काढून टाका, पण मी राजीनामा देणार नाही”

निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी नवनिर्वाचित आमदारांची आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत बोलताना त्या म्हणाल्या, “भाजपने चुकीच्या पद्धतीने 100 जागा लुटल्या आहेत. हा जनादेश नसून फसवणूक आहे. त्यामुळे मी स्वतःहून राजीनामा देणार नाही. राज्यपालांनी मला पदावरून हटवावे, मी त्याची वाट पाहत आहे.” यावेळी त्यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत घोटाळा केल्याचा थेट आरोप केला.

Mamata Banerjee: काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार

ममता बॅनर्जी यांनी विजयी आमदारांना आगामी अधिवेशनात आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत. “अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व आमदारांनी काळे कपडे परिधान करून आपला निषेध नोंदवावा. आपण नैतिकदृष्ट्या जिंकलो आहोत आणि भाजपने केवळ सत्तेचा गैरवापर करून आपल्याला रोखले आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच ज्यांनी पक्षाशी प्रतारणा केली, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Mamata Banerjee :10 आमदारांची गैरहजेरी; चर्चांना उधाण

या अत्यंत बैठकीला तृणमूलचे 10 आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषतः हे आमदार उत्तर बंगाल भागातील आहेत. मात्र, पक्षाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. “काही आमदारांच्या घरात मेडिकल इमर्जन्सी होती, तर बीरभूम आणि काजलमधील हिंसाचारग्रस्त भागातील आमदारांना तिथल्या पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी थांबण्याच्या सूचना आम्हीच दिल्या होत्या,” असे पक्षाने स्पष्ट केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 07-05-2026