मुंबई: भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊतांना दोषी ठरवत १५ दिवस कारावास आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या प्रकरणावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला.
संजय राऊत कोणता चित्रपट काढणार?
मेधा सोमय्या यांच्या अब्रुनुकसान खटल्यात संजय राऊतांना १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. यावर बोलताना संजय राऊतांनी न्याय व्यवस्थेबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, “असं आहे की, मी एक सिनेमा काढणार आहे. सगळे सिनेमा काढताहेत ना. ‘बाई मी विकत घेतला न्याय’. एक गाणं आहे ना, बाई विकत घेतला श्याम, तसं बाई मी विकत घेतला न्याय. या देशात न्याय विकत घ्यावा लागतो. न्याय मिळत नाही. ज्या पद्धतीने न्याय व्यवस्थेचे संघीकरण झालेले आहे, दबाव”, असे उत्तर संजय राऊतांनी दिले.
भाजपा एका पॉर्न स्टारला पुढे करून आमच्या आरोप करतेय -राऊत
पुढे संजय राऊत म्हणाले, “एक पॉर्न स्टार, भाजपाचा; आमच्यावर आरोप करतो. आम्ही म्हणतो पॉर्न स्टार, त्यावर काय लक्ष द्यायचं. आमची काही बदनामी वगैरे होत नाही. खोटे आरोप. सगळ्यांवर… याला तुरुंगात टाकेन. त्याला तुरुंगात टाकेन. भाजपाची लायकी बघा एका पॉर्न स्टारला पुढे करून त्यांनी आमच्यासारख्या सगळ्यांवर आरोप केले”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“न्याय व्यवस्था तुमच्या हातामध्ये आहे. दबाव आहे. पण, आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. बरं मी आरोपच केलेले नाहीत. आरोप कुणी केले, जिथे भ्रष्टाचार झाला आहे, त्या मीरा भाईंदर महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी पुराव्यासह तक्रार दाखल केली. त्या भागाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि पोलिसांना पत्र लिहून या कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून चौकशी करण्याची मागणी केली”, असेही राऊत म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 27-09-2024