ओबीसी समाजातील व्यक्तीना जात वैधता प्रमाणपत्रासाठी आर्थिक भुर्दंड : दीपक नागले

राजापूर : कुणबी वा ओबीसी समाजातील व्यक्तीना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रतिज्ञापत्र आणि शपथपत्र तयार करताना दोनशेऐवजी आता एक हजार रुपये मुद्रांक खर्चाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्र व शपथपत्र सध्या कागदावर २० रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प लावून स्वीकारण्यात यावे, अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले यांनी केली आहे.

वाढलेला खर्च कमी करण्याची मागणी निवेदनाद्वारे राजापूर तहसीलदारांकडे करण्यात आली आहे तसेच सर्वसामान्यांना सहन कराव्या लागणाऱ्या आर्थिक भुर्दंडाकडे महसूल प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचेही नागले यांनी सांगितले. शैक्षणिक कामी वा अन्य कारणास्तव कुणबी वा ओबीसी समाजातील व्यक्तींना जातवैधता प्रमाणपत्र मिळवावे लागते. जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करताना त्यासोबत मुद्रांक पेपरवर प्रतिज्ञापत्र आणि शपथपत्र सादर करावे लागते. यासाठी यापूर्वी १०० रुपयांचा मुद्रांक पेपर चालत होता. त्यासाठी येणारा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यातील होता; मात्र, शासनाच्या नव्या नियमामुळे प्रतिज्ञापत्र वा शपथपत्रासाठी १०० ऐवजी पाचशे रुपयांचा मुद्रांक वापरावा लागत आहे. त्यामुळे आता प्रतिज्ञापत्र वा शपथपत्रासाठी २०० ऐवजी १ हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नसून, त्यांना त्याचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याकडे नागले यांनी निवेदनाद्वारे महसूल प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

‘साध्या कागदावर शपथपत्र घ्या’
एक हजार रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र वा शपथपत्र घेण्याऐवजी २० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावून साध्या कागदावर शपथपत्र आणि प्रतिज्ञापत्र घ्यावे, असे नागले यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला सूचित केले आहे. याप्रकरणी आमदार सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 09/Dec/2024