मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात घुसून अज्ञात महिलेने तोडफोड करत गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे ही महिला पास न काढताच मंत्रालयात गेल्याचे सांगितले जात आहे.
सचिवांसाठी असलेल्या गेटमधून या महिलेने मंत्रालयाच्या आवारात प्रवेश केला होता. यानंतर या महिलेने आपला रोख फडणवीसांच्या कार्यालयाकडे वळविला. गुरुवारी सायंकाळची ही घटना असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईत पाऊस सुरु असल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची घरी जाण्याची घाई सुरु होती. या मोक्याच्या वेळी ही महिला मंत्रालयात शिरल्याने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेचे धिंधवडे निघाले आहेत. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर फडणवीसांचे कार्यालय आहे. त्या कार्यालयाची पाटी या महिलेने काढून फेकून दिली. तसेच तिथे आरडाओरडा करत ठेवण्यात आलेल्या कुंड्या देखील फेकण्यास सुरुवात केली.
या घटनेनंतर ही महिला पसारही झाली. ही महिला कोण होती, ती कशासाठी आली होती? ती पसार कशी झाली आदी प्रश्नांची उत्तरे आता पोलीस प्रशासन शोधत आहे. परंतू, एकंदरीतच उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात घुसून गोंधळ घालत, तोडफोड करत बिनदिक्कत ही महिला बाहेरही कशी पडली, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 27-09-2024