खेड तालुक्यात पावसाची उघडीप

खेड : खेड तालुक्यात काल पावसाने दुपारनंतर उघडीप दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी भात शेतीचे नुकसान झाल्याची माहिती कृषी अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

खेड शहर व तालुक्यात गुरुवारी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती आणि त्यामुळे कुडोशी मार्गावरील वाहतूकही काही काळ थांबली होती. रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्यात आल्याने आता कुडोशी मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झालेली आहे.

खेड तालुक्यातील नातूवाडी मध्यम प्रकल्प, शिरवली लघु प्रकल्प, पिंपळवाडी लघुप्रकल्प ही तीनही धरणे पूर्णक्षमतेने भरली असून, या तीनही धरणांच्या सांडव्यावरून थोड्याफार प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
जगबुडी नदीची पाण्याची पातळी धोक्याच्या खाली आली असून खेड शहरातील व्यापाऱ्यांना आता काहीही धोका नाही. सायंकाळी पाच वाजता जगबुडी नदीची पाण्याची पातळी ५.७५ मीटर होती ७ मीटर ही धोक्याची पातळी आहे. गुरुवारी सायंकाळी ही पातळी ६.९० मीटरपर्यंत गेली होती. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याची पातळी आता हळूहळू कमी होत आहे.

खड्यांमुळे वाहनचालकांची कसरत…
खेड शहरात बस स्थानक ते डेंटल कॉलेज या मार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. खेड नगर परिषदेने तातडीने याकडे लक्ष देऊन हा रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 28/Sep/2024