गावखडी समुद्रकिनारी आढळला दुर्मीळ समुद्रकावळा

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी मास्कड बुबी (Masked booby) अर्थात मोठा समुद्रकावळा हा पक्षी आढळून आला. खोल समुद्रातील या पक्ष्याचा किनारी भागात आढळ दुर्मीळ आहे. कावळे किंवा अन्य प्राण्यांकडून त्या पक्ष्यावर हल्ला होऊ नये, यासाठी स्थानिक प्राणीमित्रांनी त्याची विशेष काळजी घेतली.

शुक्रवारी (ता. २७) दुपारी गावखडी येथील सिद्धार्थ पावसकर याला किनारी भागात वेगळा दिसणारा पक्षी आढळला. त्याने ही माहिती प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर यांना दिली. हा विषय त्यांनी वनविभागाचे अधिकारी प्रकाश सुतार यांना सांगितली. किनाऱ्यावरील अन्य पक्ष्यांकडून त्या पक्ष्याला कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी डिंगणकर यांनी घेतली. दुपारनंतर या समुद्र कावळ्याला आठ ते नऊ बांगडे खाण्यास दिले. तो व्यवस्थित खात होता. तसेच तो उडतही होता. सायंकाळपर्यंत त्याच्यावर ग्रामस्थांनी लक्ष ठेवले होते. यापूर्वी गुहागर किनारी आढळल्याची नोंद आहे.

याबाबत डिंगणकर म्हणाले, मोठा समुद्री कावळा हा सुलिफॉर्मेंस वर्गातील सुलिडे कुळातील एक पक्षी आहे. त्याला इंग्रजीत मास्कड बुबी, तर हिंदीमध्ये जलकौवा, पानकौवा म्हणतात. हा पक्षी आकाराने राजहंसापेक्षा मोठा असतो. प्रामुख्याने शुभ्रवर्णाचा, पंखाची किनार काळी, पिवळी, नारिंगी किंवा निळसर असते. तोंड आणि कंठावरील उघड्या कातडीचा रंग काळा-निळा असतो. भारतात विणीनंतर व त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या किनारपट्टीवर तसेच वर्षाऋतूमधील वादळातून भारताचा पश्चिम किनारा आणि श्रीलंकेपर्यंत हे पक्षी आढळतात. तसेच मालदीव बेटावरही हे पक्षी आढळतात.

आज समुद्रात नेणार
किनारी भागात आढळलेला पक्षी स्वतःहून समुद्राकडे रवाना झाला नाही, तर वन विभागाच्या परवानगीने त्या पक्ष्याला खोल समुद्रात मच्छीमारी नौकांवरून नेण्यात येईल. समुद्रात सोडल्यावर तो आपणहून खोल पाण्यात जाईल, असे डिंगणकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 28/Sep/2024