देवरूख (रत्नागिरी): देवरूख शहरासह संपूर्ण परिसरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि सीएनजी इंधनाचा तीव्र तुडवडा निर्माण झाला आहे. वाढता उन्हाचा कडाका आणि इंधनासाठी करावी लागणारी तासनतास प्रतीक्षा यामुळे स्थानिक नागरिक, पर्यटक आणि व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.
इंधनाचा ठणठणाट आणि ‘नो स्टॉक’चे फलक
- शहरातील एका प्रमुख पेट्रोल पंपावर गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल उपलब्ध नसल्याने पूर्णपणे ठणठणाट आहे.
- ज्या पंपावर अत्यल्प साठा शिल्लक आहे, तिथे काही तासांतच ‘नो स्टॉक’चे फलक लागत आहेत.
- टँकर वेळेवर न आल्यामुळे इंधन पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
पर्यटक आणि महिला-मुलांचे प्रचंड हाल
सध्या उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईचा हंगाम असल्याने कोकणात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. मात्र, इंधनाअभावी पर्यटकांना प्रवासात मोठ्या अडचणी येत आहेत. दुपारच्या कडक उन्हात ४ ते ५ तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने महिला आणि लहान मुलांचे हाल होत असून पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
रिक्षा व्यवसाय संकटात
या टंचाईचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसला आहे. दिवसभर भाडी मारण्याऐवजी रिक्षाचालकांचा अर्धा दिवस पंपावरच रांगेत जात आहे. इंधन मिळेलच याची शाश्वती नसल्याने अनेकांनी आपल्या रिक्षा घरीच उभ्या केल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
“दिवसाचे ४-५ तास रांगेत गेले तर प्रवाशांना सेवा कधी देणार आणि घर कसं चालवणार? भर उन्हात उभे राहून डोकं भणभणतंय. पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल.” — विनायक कदम, स्थानिक रिक्षाचालक, देवरूख
आंदोलनाचा पवित्रा
देवरूखमधील या इंधन टंचाईबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ही समस्या लवकर न सुटल्यास संतप्त वाहनधारकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 02-05-2026














