चिपळूणच्या १६ वर्षीय मुलाचा कोल्हापुरात नदीत बुडून मृत्यू; सुट्टीसाठी मामाकडे गेला असताना ओढवला काळ

चिपळूण/राधानगरी: उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी चिपळूणहून कोल्हापूरला आपल्या मामाकडे गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा दूधगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. स्वराज्य संदीप शिंदे (रा. ओवळी, ता. चिपळूण) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे चिपळूण आणि राधानगरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


नेमकी घटना काय?

स्वराज्य शिंदे याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षा संपल्यानंतर सुट्टी घालवण्यासाठी तो कोल्हापुरातील कळंबा येथे आपल्या मामाकडे आला होता. बुधवारी तो मामा ओंकार पाटील आणि त्यांच्या मित्रांसोबत काळमावाडी धरण परिसरात सहलीसाठी गेला होता. सहलीचा आनंद घेत असताना सर्वजण दूधगंगा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पोहत असताना स्वराज्यला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पात्रात बुडाला.

काळोख्या डोहात सापडला मृतदेह

स्वराज्य बुडाल्याचे लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्यांनी त्याला शोधण्याचा मोठा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बुधवारी रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबवावी लागली होती. गुरुवारी सकाळी पुन्हा स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने शोध सुरू केला असता सकाळी १० च्या सुमारास ‘काळोख्या डोहा’तून स्वराज्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने ओवळी गावावर शोककळा

स्वराज्य हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील दुबई येथे नोकरीला असून, मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. स्वराज्यच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. सुट्टी संपवून घरी परतण्याऐवजी मुलाचा मृतदेह घरी येणार असल्याने ओवळी गावातील ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.


पोलीस तपास सुरू

राधानगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अशोक शेळके आणि किरण पाटील या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 02-05-2026