रत्नदुर्ग किल्यावर उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीमध्ये सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक तैनात ठेवा; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रत्नागिरी शहराच्यावतीने मागणी

रत्नागिरी : रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती भव्य पुतळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी रत्नागिरी नगर परिषदेने घ्यावी. शिवसृष्टीच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात यावेत आणि सुरक्षारक्षक नेमावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार रत्नागिरी शहराच्यावतीने करण्यात आली आहे.

रत्नागिरी नगरपरिषदेच्या माध्यमातून रत्नदुर्ग किल्ला येथे शिवसृष्टीचे बांधकाम सुरु असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळून राज्यभरातील जनतेने संताप व्यक्त केला आहे.

याच विषयाला अनुसरून रत्नागिरी नगरपरिषद उभारत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय म्हणून सीसीटीव्ही सुरक्षा कर्मचारी नेमणे, पोलीस संरक्षण तैनात करणे, जेणेकरून भविष्यात कोणतेही दुष्कृत्य या ठिकाणी घडणार नाही. या पर्यटनस्थळी जर कोणती अप्रिय घटना घडली तर याची पूर्णतः जबाबदारी नगरपरिषद प्रशासक म्हणून आपली राहील, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष रत्नागिरी शहराच्या वतीने नगरपरिषद प्रशासक तुषार बाबर यांना देण्यात आले. प्रसंगी शहराध्यक्ष निलेश भोसले, माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, माजी नगरसेवक बबन आंबेकर, माजी नगरसेवक सईद पावसकर, उपाध्यक्ष रवी घोसाळकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 28-09-2024