देवरूखच्या वेदपाठशाळेतील व्याख्यानाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद

देवरूख : देवरूख येथील श्री गणेश वेदपाठशाळेत कुडाळ येथील प्रसिद्ध वैद्य सुविनय दामले यांनी आयुर्वेद आणि दिनचर्या उलगडली.

वेदपाठशाळेच्या २७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात दामले यांच्या व्याख्यानाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

व्याख्यानाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या शांतीपाठाने झाली. वैद्य दामले यांचा सन्मान अध्यक्ष संजय भागवत यांच्या हस्ते झाल्यावर व्याख्यानाला सुरुवात झाली.

वैद्य दामले यांनी सुरुवातीला आधुनिक वैद्यक शास्त्र आणि प्राचीन आयुर्वेदिक शास्त्र यामधील फरक सविस्तर विशद केला. भारतीय जीवन पद्धती, आयुर्वेद आणि धर्म यामध्ये आरोग्य दडले असल्याचे त्यांनी सांगितले. मन, इंद्रिय व आत्मा यांचे अन्नसेवनावर होणारे चांगले व वाईट परिणाम उपस्थितांसमोर स्पष्ट केले. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी उपचार पद्धतीमधील फरक विशद केला. आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिल्यावर आपले शरीर आपल्याला आपला आजार कशा प्रकारे दर्शवते, हे त्यांनी उदाहरणांसह मांडले. वैद्यक क्षेत्रातील उपचार पद्धतीमधील फसवणुकीबाबत आलेले अनुभव विनोदी शैलीत कथन केले. ॲलोपॅथीमध्ये प्रयोगशाळेतील रिपोर्टद्वारे रुग्णाला नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला जातो, तर आयुर्वेदामध्ये कायाचिकित्सा करून औषधोपचार सुरू केला जातो.

अभ्यंगाचे महत्त्व, विविध सणांमधील लसीकरणाचे महत्त्व, विविध रोग व आजारांवरील उपाय, विश्रांतीचे महत्त्व, देहशुद्धीकरणाचे महत्त्व व आयुर्वेदिक उपाय, आयुर्वेदातील पथ्य व अपथ्य याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. आरोग्यदायी जीवनासाठी व शारीरिक संपदेसाठी स्व-प्रदक्षिणा आणि लोटांगण हे उत्तम व्यायाम कसे आहेत, याबाबत सखोल माहिती दिली.

यावेळी वनवासी कल्याण आश्रमाला देणगी देणारे देवरूखचे दानशूर व्यक्तिमत्त्व मदन मोडक यांना पाठशाळेचे अध्यक्ष संजय भागवत यांनी सन्मानित केले. मोडक यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व दोन्ही मान्यवरांचा परिचय प्रा. मंजुश्री भागवत यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 20-12-2024