मुंबई: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या एका वादग्रस्त विधानाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल केलेल्या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले असून, सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत बागेश्वर बाबांवर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली आहे.
नक्की काय म्हणाले धीरेंद्र कृष्ण शास्त्री?
एका कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक दावा केला. त्यांनी आपल्या विधानात म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यानंतर ते रामदास स्वामींकडे गेले. त्यावेळी त्यांनी ‘आता मला जास्त लढायचे नाही, हे मुकूट आणि सत्ता तुम्ही सांभाळा’ असे रामदास स्वामींना सांगितले. त्यावर रामदास स्वामींनी त्यांना ‘शिष्याचे कर्तव्य हे गुरूच्या आदेशांचे पालन करणे असते, त्यामुळे ही सत्ता तुम्हीच सांभाळावी’ असे सांगितले.”
शास्त्रींच्या या विधानामुळे इतिहासतज्ज्ञ आणि शिवप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराजांच्या इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी केली जात असल्याचा आरोप होत आहे.
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मीडिया (ट्विटर) वरून आपल्या भावना व्यक्त केल्या असून, बागेश्वर बाबांवर कारवाईची मागणी केली आहे.
रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडे दिला, हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचे वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती.”
“महाराष्ट्रात बागेश्वर बाबांवर बंदी घाला”
रोहित पवार यांनी सरकारलाही धारेवर धरले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, “शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढे महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. ज्या स्टेजवर हे वक्तव्य झाले, तिथे उपस्थित असलेले राज्यकर्ते मूक प्रेक्षक बनून बसले होते, याचे अधिक दुःख वाटते.”
महापुरुषांच्या प्रतिमेला मलिन करण्याचा प्रयत्न?
रोहित पवार यांनी या वादाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. ते म्हणाले की, “वारंवार अशा प्रकारची वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचे महत्त्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला जात आहे का, अशी शंका येते.”
आता शिवप्रेमींची भूमिका महत्त्वाची
सरकार या प्रकरणावर कारवाई करेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करत रोहित पवार यांनी आता जनतेला आवाहन केले आहे. “आता ‘सहन करत दुर्लक्ष करायचे की धडा शिकवायचा’, हे शिवप्रेमी जनता आणि महामानवांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या वादामुळे आता आगामी काळात राज्यभरात शिवप्रेमी संघटना कशाप्रकारे प्रतिक्रिया देतात आणि सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 25-04-2026














