राघव चड्ढांचा भाजपमध्ये प्रवेश; एका रात्रीत १० लाखांहून अधिक तरुणाईचा अनफॉलो करत ‘डिजिटल स्ट्राईक’

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाला (AAP) राज्यसभेत मोठा राजकीय फटका बसला आहे. पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह एकूण सात खासदारांनी आम आदमी पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. या राजकीय घडामोडीनंतर सोशल मीडियावरही जोरदार पडसाद उमटले असून, तरुण पिढीने राघव चड्ढा यांना ‘डिजिटल स्ट्राईक’ देत मोठ्या प्रमाणात अनफॉलो केले आहे.

२/३ खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

भारतीय संविधानातील तरतुदींचा वापर करत, राज्यसभेतील ‘आप’च्या दोन-तृतीयांशपेक्षा जास्त खासदारांनी भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. राघव चड्ढा यांनी स्वतः ही माहिती देताना सांगितले की, “आम्ही राज्यसभेच्या अध्यक्षांना सर्व आवश्यक कागदपत्रांसह पत्र सादर केले आहे.” या विलीनीकरणामुळे राज्यसभेत ‘आप’ची ताकद आता बऱ्याच अंशी कमी झाली आहे.

तरुणाईचा ‘डिजिटल स्ट्राईक’

राघव चड्ढा यांचा हा निर्णय त्यांच्या युवा चाहत्यांना, विशेषतः जेन-झेड (Gen-Z) पिढीला अजिबात आवडलेला दिसत नाही. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चड्ढा यांच्यावर इन्स्टाग्रामवर अनफॉलोअर्सचा पाऊस पडला आहे.

  • आकडेवारी: भाजप प्रवेशाच्या निर्णयापूर्वी त्यांचे १४.६ मिलियन (१.४६ कोटी) फॉलोअर्स होते. मात्र, अवघ्या काही तासांत हा आकडा १३.५ मिलियनवर आला आहे. म्हणजेच, एका रात्रीत १० लाखांहून अधिक युजर्सनी त्यांना अनफॉलो केले आहे.
  • कारणे: चड्ढा यांनी संसदेत निवडणूक वय २५ वरून २१ करणे, डेटा ट्रान्सफर, शिक्षण, रोजगार आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर्सच्या सुरक्षेसारखे तरुणांना आकर्षित करणारे मुद्दे मांडले होते. मात्र, आता त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे तरुणाई नाराज असल्याचे दिसते.

“मला गुन्ह्यांमध्ये सामील व्हायचे नव्हते”

पक्ष सोडण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण देताना राघव चड्ढा यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “आम्ही करिअर घडवण्यासाठी राजकारणात आलो नाही, तर देशाच्या सेवेसाठी आलो होतो. मात्र, आम आदमी पार्टी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. गेल्या काही काळापासून मी पक्षापासून अलिप्त होतो, कारण मला पक्षाच्या गुन्ह्यांमध्ये सामील व्हायचे नव्हते.”

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या कामाचे कौतुक केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे निर्णय घेतले जे घेण्यास इतर नेते घाबरत होते. दहशतवादाचे निर्मूलन आणि देशाला जागतिक अर्थव्यवस्थेत अव्वल स्थानी नेणे यासाठी जनतेने मोदींच्या नेतृत्वावर तीनदा विश्वास दाखवला आहे,” असे सांगत आता आपण गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे चड्ढा यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 25-04-2026