निवळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

रत्नागिरी : दि. १९ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास निवळीच्या मालपवाडीतील वसंत देमू मालप यांच्या घराजवळील विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली.

विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर पुढच्या दीड तासात बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो सुस्थितीत असल्याची खात्री पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

याबाबत वन विभागाकडून देण्यात आलेली सविस्तर माहिती अशी : काल रात्री निवळी येथील मालपवाडी येथे वसंत देमू मालप यांच्या मालकीच्या परसातील कठडा असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी श्रीमती रसिका सावंत यांनी जाकादेवीच्या वनरक्षकांना कळविली. रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी पिंजऱ्यासह धाव घेतली. विहीर अंदाजे ६५ फूट खोल असून, यात बिबट्या पाण्यावर पोहत असल्याचे आढळले. दोरीच्या साहाय्याने चौफळा विहिरीत सोडून त्याचा आधार देऊन बिबट्याला सुरक्षित बसण्याची जागा करण्यात आली. त्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास विहिरीमध्ये पिंजरा सोडण्यात आला. साधारण अर्ध्या तासात बिबट्याने पिंजऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तात्काळ पिंजऱ्याचा दरवाजा बंद करून बिबट्याला जेरबंद करण्यात आले.

त्यानंतर कोतवडे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कसाळकर यांच्याकडून बिबट्याची तपासणी करून घेऊन तो सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली. बिबट्या मादी जातीचा असून अंदाजे तीन वर्षांचा आहे. त्याला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

रत्नागिरी-चिपळूणच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याची सुटका करण्याची कार्यवाही केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 21-12-2024