राजापूर : राजापूर एस. टी. आगारातून भू- पेंडखळे-भालावली या मार्गावर वस्तीच्या बस फेऱ्या पाठविल्या जात असताना गेले दोन महिने या फेऱ्यांमधील एक वस्तीची फेरी कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्याने दररोज सकाळच्या सत्रात सुमारे पंधरा ते वीस विद्यार्थी बसमध्ये प्रवेश मिळू न शकल्याने शिक्षणापासून वंचित राहू लागले आहेत.
दररोज सुमारे १३५ पासधारक विद्यार्थी तसेच जोडीला रोजचे प्रवासी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा नसल्यामुळे स्टॉपवरून परत घराकडे जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजापूर एसटी आगाराच्या परस्पर मनमानी कारभारामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता नेहमीच्या बसेस रद्द केल्यामुळे थांब्यावर बिनभरवशी ताटकळत उभे राहून विद्यार्थी व प्रवाशांचे नाहक हाल सुरू आहेत. राजापूर एसटी आगाराच्या अनेक वस्तीच्या गाड्या अचानक रद्द केल्या जात असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक प्रवाशांचे अतोनात हाल आणि नुकसान होत आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हक्काचे आणि विश्वासाचे प्रवासाचे साधन म्हणून एस्टी महामंडळाकडे पाहिले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक गावातील वस्तीच्या फेऱ्या अचानक रद्द करण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा मनःस्ताप आणि नुकसान सर्वसामान्य प्रवासी वर्गाला सोसावे लागत आहे. गेले दोन महिने भू-पेंडखळे-भालावली या मार्गावरील या फेऱ्यांमधील एक वस्तीची फेरी अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्यामुळे दुसऱ्या दिवशी एकाच बसला गर्दी झालेली पहायला मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 21/Dec/2024