शरद पवारांच्या हस्ते उद्या राज्यातील सर्व खासदारांचा सत्कार

सोलापूर : देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा सोहळा अकलूज येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आयोजित केलेला आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विजयसिंह मोहिते पाटील, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते राज्यातील सर्व खासदारांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे. महायुतीचे (Mahayuti) कुठले खासदार या सोहळ्याला हजेरी लावणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राज्यात निवडून आलेल्या सर्व 48 खासदारांना सत्कारासाठी निमंत्रित केले आहे. मंत्री वगळता सर्व पक्षाचे नूतन खासदार येतील, असा विश्वास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार दणका दिल्याने या कार्यक्रमाला आता महायुतीचे कोणते खासदार हजर राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याचे कारणही तसेच असून काही दिवसांपूर्वी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केंद्रात लवकरच बदल घडेल, असे भाकीत वर्तवले होते. आता मोहिते पाटील यांनी राज्यातील सर्व खासदारांना सत्कारासाठी निमंत्रण दिल्याने महायुतीचे खासदार काय भूमिका घेणार? हे उद्या स्पष्ट होणार आहे.

उद्याच्या कार्यक्रमानंतर काय होईल हे महाराष्ट्र पाहणार

अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून येथे मोहिते पाटील यांचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत जे नवीन समीकरण बनले त्याचा चमत्कार महाराष्ट्राने बघितला, असे सांगताना उद्याच्या कार्यक्रमानंतर काय होईल हे महाराष्ट्र पाहील, असेही संकेत त्यांनी यावेळी दिले आहे.

महाविकास आघाडीतून निवडणूक लढण्यास अनेक इच्छुक

सोलापूर जिल्ह्यात नुसतं माढा आणि पंढरपूर नसून सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्याची तयारी आहे. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील व उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. 1 ऑक्टोबरनंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात बैठकीला सुरुवात होणार आहे. यानंतर कोणती जागा कोणाला मिळेल हे निश्चित होईल, असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:02 28-09-2024