रत्नागिरी : आरोग्य विभागाकडून जोखीमग्रस्त भागातील क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी २३ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२५ दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे.
या मोहिमेच्या नियोजानासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्या सूचनेनुसार व मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकारण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदान व क्षयरोगावरील औषधोपचार मोफत उपलब्ध आहे. जोखीमग्रस्त घटकामध्ये फुप्फुसाचा क्षयरोग असणारे रुग्ण होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे व त्याबाबत डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळले आहे. परिणामी संसर्गामुळे रुग्णांची संख्या वाढण्यास मदत होत असल्याचे दिसून आले आहे.
या मोहिमेच्या नियोजनाबाबत घेण्यात येणाऱ्या सर्व बाबींचा मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी आढावा घेऊन जोखमीच्या सर्व भागात प्रत्यक्ष सर्वेक्षण करून मोहीम यशस्वी होण्याबाबत सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच नागरिकांनी या मोहिमेमध्ये घरभेटीत तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे व आपला जिल्हा टीबी मुक्त होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील चिरेखाणीतील कामगार, कारागृहातील कैदी, दिव्यांग शाळा व वसतिगृह, वृद्धाश्रम, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, आंब्याच्या बागांमधील राखणदार व मजूर, निर्वासितांची छावणी, औधोगिक कामगार वसाहत, आदिवासी वाडी वस्ती, पोहचण्यासाठी अवघड गावे आणि वस्त्या, ज्या गावात टीबी रुग्ण जास्त आहेत अशी गावे, आदिवासी शाळा व वसतिगृह, लोकसमुदायातीलच अतिकुपोषित भाग म्हणून ओळख असलेला आदिवासी भाग, एचआयव्ही अतिजोखीम गट, बेघर व रस्त्यावरची मुले, अनाथालय, आदिवासी भागातील कमी हवेशीर असलेल्या आदिवासी झोपड्या, बाल टीबी रुग्णांचे सह्वासित, मागील २ ते ३ वर्षांपासून टीबी रुग्णांच्या संपर्कात व सहवासात असलेली व्यक्ती, ६० वर्षांपेक्षा अधिक वयाची व्यक्ती, धूम्रपान करणारे, मधुमेही अशा शहरी, ग्रामीण, आदिवासी जोखीमग्रस्त भागाच्या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी दिली.
दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, तसेच दोन आठवड्यांपेक्षा अधिक मुदतीचा ताप, मागील तीन महिन्यांमध्ये वजनात लक्षणीय घट, मागील सहा महिन्यांच्या कालावधीत कधीही थुंकीवाटे रक्त पडत असल्यास, मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे, यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले असल्यास अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी व जोखमीच्या भागात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची थुंकी तपासणी व क्ष-किरण तपासणी करावी, असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:49 21-12-2024